दहावी,बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई/महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२वीच्या लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालतील. यासोबतच, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होऊन ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि ऑनलाइन परीक्षा देखील याच कालावधीत होतील.माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच १०वीच्या लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होतील आणि १८ मार्च २०२६ रोजी संपतील. शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि गृहविज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान घेतल्या जातील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील या वेळापत्रकात समाविष्ट आहेत.