भाईंदर/ पनवेल आणि मुंबईत डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचा अनेकदा दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वी चक्क गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरही पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे, मुंबईतील डान्स बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणि केंद्रस्थानी आला होता. आता, मुंबईतील काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत ५ बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचा पर्दाफाश करून त्यामधून ५ बारबालांची सुटका केली आहे. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण १२ बारबालांचीही पोलिसांनी मुक्तता केली. तसेच, बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
बारमाफियाने पोलिसांच्या नजरेआड करण्यासाठी बारच्या आत दोन गुप्त केव्हेटी तयार केल्या होत्या. एका केव्हेटीचा दरवाजा काचेमागे लपवण्यात आला होता. आत गेल्यावर आतून लॉक केल्यास बाहेरुन उघडणे अशक्यप्राय होते. दुसऱ्या गुप्त दरवाजासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर तीन पिनचा प्लग लावावा लागायचा आणि त्याच्या बाजूचे बटन ऑन केल्यावर, गुप्त दरवाज्यावर जोरदार लाथ मारल्यावरच तो दरवाजा उघडायचा. अशी भन्नाट व गुंतागुंतीची यंत्रणा बसवून बारमालक व मॅनेजर बारबालांना लपवत असत.

