मुंबई : नारळी पोर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने मुंबईत वरळीच्या कोळीवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सर्व कोळीबांधव यावेळी समुद्राला नारळ अर्पण करतात. पूजा करतात. नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त वरळी कोळीवाड्यात आज नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पण या कार्यक्रमात राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडींमुळे काही काळासाठी कोळीवाड्यातील वातावरण तापलं होतं. पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठं काही घडलं नाही. नारळी पौर्णिमा निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. नेमकं याच वेळी आमदार आदित्य ठाकरे देखील इथे दाखल झाले. त्यामुळे तिथलं वातावरण काही क्षणांसाठी तापलेलं बघायला मिळालं.आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले. पण अतिशय अटीतटीच्या लढतीत त्यांचा विजय झाला. त्याआधी ते वरळीतून बिनविरोध निवडून आले होते. पण शिवसेना फुटीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाचा प्रतिकार करावा लागला.
आदित्य ठाकरे यांना बॅकफूटला टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जातो. ते आजदेखील बघायला मिळालं. आदित्य ठाकरे दरवर्षी वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेला जातात. तिथल्या कोळीबांधवांसोबत नृत्य देखील करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. पण यावेळी आदित्य ठाकरे कोळीवाड्यात पोहोचण्याआधीच एकनाथ शिंदे तिथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

