कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी आलेल्या पावसाने काहीसा गारवा मिळाला, पण आजरा शहरातील आठवडी बाजारावर पाणी फेरले. दरम्यान, तालुक्यातील हत्तीवडे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी मजूर महिला जखमी झाली. अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय 36, मुळगाव अलिबाद, जि. विजापूर कर्नाटक) असे जखमी महिलेचे नाव आहे.दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने आजर्याचा आठवडा बाजार ही दुपारीच संपला. वाऱ्यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही पडला आहे.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाठोपाठ सातारा, मेढा, जावली या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली. जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पुलगाव परिसरात काही ठिकाणी पावसादरम्यान एक ते दोन मिनिट बोराच्या आकाराची गार कोसळली. विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस वादळी वार्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
.
