बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ आणि विलेपार्ले परिसरातील विविध विकासकामांची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात एच पश्चिम विभागातील टिळक मार्ग व महात्मा गांधी मार्ग, एच पूर्व विभागातील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग तसेच के दक्षिण विभागातील विले पार्ले रेल्वे स्थानक परिसरातील मार्गांचा प्रामुख्याने समावेश होता.
या दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी पदपथांची सद्यस्थिती जाणून घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाचे निर्देश दिले. टिळक मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवून सर्व पदपथ पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे मोकळे करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, विले पार्ले रेल्वे स्थानक मार्गावरील रेलिंग काढून पदपथ रुंद करणे आणि स्थानक परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पदपथांचा अधिक सुलभ व विनाअडथळा वापर करता यावा, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्यात उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ ३). विश्वास मोटे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, सहायक आयुक्त (एच पश्चिम) दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) श्रीमती मृदुला अंडे आणि सहायक आयुक्त (के दक्षिण विभाग) श्रीमती वनिता कोकाटे यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे मुंबईकरांचे रस्ते व पदपथ अधिक सुरक्षित आणि चालण्यासाठी सुलभ होतील, अशी अपेक्षा आहे.
