मुंबई:
येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडल परिवार’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. “युवा पिढी, राष्ट्रनिर्माण आणि करिअरच्या संधी” या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात धर्माधिकारी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या या युगात तरुण अभियंत्यांवर केवळ स्वतःचे करिअर घडवण्याचीच नव्हे, तर देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची मोठी जबाबदारी आहे. केवळ पदवी मिळवणे हे ध्येय न ठेवता विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे.
स्पर्धा परीक्षांकडे (UPSC/MPSC) वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशासकीय सेवेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतात, याचे प्रात्यक्षिक दाखले त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने आप्पासाहेब देसाई यांनी अविनाश धर्माधिकारी सरांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन धर्माधिकारी सरांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.
