मुंबई:
मुंबई सहकारी मंडळाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने दणदणीत यश मिळवले असून सर्व २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील परस्पर विश्वास आणि समन्वयातून ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने ही निवडणूक लढवली होती. सहकार चळवळीला अधिक बळकट करणे आणि संस्थांच्या विकासाला गती देणे हा या समन्वयाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ:
या निवडणुकीत प्रवीण यशवंत दरेकर, शिवाजीराव नलावडे, मिलिंद कांबळे, अंकुश जाधव, अमोल खरात, वर्षा माळी, नितीन बनकर, सतीश सावर्डेकर, विजय जाधव, अनिल गजरे, अनिल कांबळे, बाळासाहेब घाडगे, मिलिंद राऊत, श्रीधर जगताप, किशोर पाटणकर, प्रवीण डिकले, सुरेश भालेराव, विठ्ठल वाळुंज, जयंत शिरसिकर, मदन यादव आणि अनिषा माजगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
‘संघर्षाऐवजी समन्वयाचा संदेश’
“या बिनविरोध निवडीमुळे मुंबईतील सहकार क्षेत्राने संघर्षाऐवजी समन्वय आणि स्पर्धेऐवजी सहकार्याला प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. आगामी काळात सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणे आणि सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. बिनविरोध निवडीबद्दल सहकार क्षेत्रातील विविध संघटना व पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
