पुणे:
हाय-इंटेंसिटी लेझर बीम आणि डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणारा हृदयविकाराचा धोका, बहिरेपणा आणि दृष्टी जाण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीजे बंदीची मागणी जोर धरत आहे. नागपुरात पुढील दोन महिन्यांसाठी डीजेवर बंदी घालण्यात आली असली, तरी राज्यव्यापी पूर्ण बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतीही घाई न करता चर्चेचा मार्ग निवडला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, केवळ कायद्याच्या बडग्याने बंदी न घालता लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणे अधिक महत्त्वाचे आहे. उत्सव जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली असून अनेक घटकांचे यावर एकमत होत आहे. लोकांच्या सहभागानेच डीजेचे हे स्तोम कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यव्यापी धोरणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हे धोरण एका रात्रीत तयार होणार नाही. ज्या ठिकाणी चर्चा झाली, तिथे ९५ टक्के लोक सहकार्यासाठी पुढे येत आहेत. चर्चेतून एकमत घडवून मगच आदेश काढण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरू आहे. दिश स्पष्ट असली तरी तातडीने ठाम बंदी न लादल्यामुळे नागरिकांना सण-उत्सवांच्या काळात डीजेच्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता कायम आहे.
