आज शिक्षण हे ज्ञानाचे साधन कमी आणि स्पर्धेचे रणांगण अधिक बनले आहे. गुण आणि रँक यांनाच यशाचे अंतिम मोजमाप समजले जाऊ लागले आहे. नीट सारख्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी बसतात, पण जागा मर्यादित असतात. यामुळे लाखो विद्यार्थी “कमी बुद्धिमान” असे मानले जात नाहीत, पण निकालाच्या दिवशी समाज “हुशार” आणि “नालायक” अशी विभागणी करतो. ही विभागणी अन्यायकारक आहे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर घाव घालणारी आहे. प्रत्येक वर्षी काही विद्यार्थी नैराश्यात जातात, काही स्वतःला अपयशी समजू लागतात आणि काहीजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
अनेक पालक आपल्या अपूर्ण राहिलेल्या आकांशा मुलांच्या खांद्यावर लादताना दिसतात. आई-वडिलांना तो डॉक्टर व्हावा असे वाटते, पण मुलाला डाॅक्टर व्हायचे आहे की नाही, यापेक्षा ही भावना तीव्र होते. लाखो रूपये खर्चून कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश दिला जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, टेस्ट सिरीज, रँकिंग आणि तुलना यांचे चक्र सुरू असते. अशा परिस्थितीत विद्यार्थी हळूहळू स्वतःच्या इच्छांपासून दूर जातो आणि केवळ अपेक्षेचे ओझे वाहू लागते. निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही की विद्यार्थ्याला “जीवनापेक्षा अपयश मोठे वाटू लागते.”
शिक्षणव्यवस्था देखील या समस्येस जबाबदार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुण, टक्केवारी आणि रँक यांवर भर दिला जातो. मात्र मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि अपयशाचा सामना कसा करावा याचे शिक्षण फारसे दिले जात नाही. कोटा, पुणे, नागपूर, मुंबई, दिल्ली यांसारख्या कोचिंग केंद्रांमध्ये हजारो विद्यार्थी घरापासून दूर राहून शिक्षण घेतात. स्पर्धेचे प्रचंड दडपण, एकाकीपणा आणि सततच्या तुलनेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळते.
पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. “आम्ही तुझ्या सोबत आहोत” हा विश्वास मिळाला पाहिजे. मुलाचे मूल्य त्याच्या गुणांवर नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि माणूसपणावर अवलंबून आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था यांनी मानसिक आरोग्य सल्लागारांची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे. सरकारने शिक्षणातील स्पर्धेचे दुष्परिणाम गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
गुणपत्रिका ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा संपूर्ण अहवाल नसते. ती केवळ एका परीक्षेतील कामगिरीची नोंद असते. माणसाची किंमत त्याच्या गुणांनी नव्हे, तर त्याच्या जिद्दीने, संवेदनशीलतेने आणि पुन्हा उभे राहण्याच्या क्षमतेने ठरते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरूवातीचा पहिला टप्पा आहे. एका निकालामुळे जीवन संपवण्याइतके जीवन स्वस्त नाही. निकाल महत्त्वाचा असतो, पण जीवन त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सांगायला हवे: “तू गुणांपेक्षा मोठा आहेस, रँकपेक्षा मौल्यवान आहेस आणि कोणत्याही परीक्षेपेक्षा तुझे जीवन अधिक महत्त्वाचे आहे.”

