पत्रकारांसाठी उभारला ‘आपलेपणाचा’ नवा आधार
लोणावळा : पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळीच्या, तणावाच्या आणि सतत बदलणार्या वास्तवात थोडासा विरंगुळा, शांतता आणि आत्मीयतेचा निवारा मिळावा, या भावनेतून पन्नास वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या कै. दी. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन आता एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे.
या विश्रामधामाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी श्री.अशोक साबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे विश्रामधाम केवळ वास्तू नसून, पत्रकारांच्या आयुष्याशी जोडलेली एक भावनिक कहाणी आहे. सतत समाजासाठी झटणार्या पत्रकारांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. आयुष्यातील थकवा घालवणारा आणि नव्या उर्जेने पुन्हा कार्यरत होण्यासाठी प्रेरणा देणारा ‘घरचा’ हळवा कोपरा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, या विश्रामधामातील प्रत्येक विटेमागे पत्रकार संघाच्या सदस्यांची मेहनत, जिद्द आणि एकोप्याची भावना दडलेली आहे. अशी प्रतिक्रीया मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
या उपक्रमामुळे पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही एक नवी दिशा मिळेल, हा केवळ उद्घाटन सोहळा नाही, तर पत्रकारांच्या आयुष्यातील ‘आपलेपणाचा’ आणि ‘विश्रांतीचा’ एक नवा अध्याय सुरू होण्याचा भावनिक क्षण आहे म्हणूनच सर्व पत्रकार बांधवांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेन्द्र शिर्वेâ यांनी केले आहे.

