मुंबई, : व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राहुल नार्वेकर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या कालावधीतील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट , माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे , विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळहा मुंडे तसेच कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.
नार्वेकर म्हणाले की, व्यसन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून ती सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, उत्पादकतेत घट, आरोग्य व्यवस्थेवर ताण, गुन्हेगारीत वाढ तसेच कुटुंबव्यवस्थेचे विघटन होण्यास कारणीभूत ठरते. समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त आणि गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले की, समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका हे कार्यकर्ते बजावत आहेत. व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या पुरस्कारांतर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी १५ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण आणि श्रीफळ तर संस्थांसाठी ३० हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देण्यात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत एकूण १०० व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

