मुंबई/ टी २० वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज साखळी सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणार आहे.मुंबई ते कोलंबो दरम्यान विमानाची तिकीट ३० ते ४० हजार असते पण भारत पाक सामन्यामुळे ही तिकीट 1 लाखांवर गेली आहे.तर दुसरीकडे या सामन्यात भारताच्या विजयासाठी देशभरात होम हवन सुरू झाले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे टी २० क्रिकेटमधील ग्रुप स्टेजचा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं असून या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहित आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने हा सामान होणार की नाही यावर शंकेचे ढग होते, मात्र आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास होकार दिलाय. श्रीलंकेतील कोलंबो येथे रविवारी भारत – पाकिस्तान सामना होणार असून हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी क्रिकेट रसिक उत्साहित आहेत. त्यामुळे अनेकजण कोलंबोसाठी रवाना होत आहेत. मात्र यामुळे कोलंबोला जाणाऱ्या विमान प्रवासाचं तिकीट महागलं असून याची किंमत लाखांच्या घरात पोहोचलीये.
जर तुम्ही शेवटच्या क्षणी दिल्ली वरून कोलंबो येथे जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. दिल्लीहून कोलंबोला जाणाऱ्या विमानाचं राउंड ट्रिप तिकीट हे ९०००० रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर मुंबईवरून जायचं असेल तर यासाठी प्रवाशांना तब्बल ७०००० रुपये खर्च करावे लागतील. तर चेन्नई किंवा कोची वरून कोलंबोला जाणाऱ्या तिकीटाची किंमत जवळपास ५०००० रुपये आहे. विशेषतज्ज्ञांचं म्हणणं आहे की १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ही सामान्य दिवसांच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढली आहे. कोलंबोच्या बुकिंगमध्ये सुमारे ६५ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, जी या सामन्याची लोकप्रियता दर्शवते.

