मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५/२६ साठी, मंगळवार २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) वितरणास जोमाने सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची उत्सुकता पहिल्याच दिवशी दिसून आली असून, मुंबईतील २३निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५अर्ज नेण्यात आले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज अधिकृतपणे दाखल झाला नाही.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना ३० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज प्राप्त करून घेता येतील आणि ते सादर करता येतील. २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध असतील, तर ३० डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच अर्ज दिले जातील. अर्ज स्वीकारण्याची वेळ दररोज सकाळी ११ ते दुपारी ५ अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, २५ डिसेंबर रोजी नाताळची सार्वजनिक सुट्टी आणि २८ डिसेंबर रोजी रविवार असल्याने या दोन दिवशी अर्ज वितरण किंवा स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद राहणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर ३१डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून अर्जांची छाननी केली जाईल. छाननी प्रक्रिया पूर्ण होताच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायची आहे, त्यांच्यासाठी २जानेवारी २०१६ रोजी दुपारी ३वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर, 3 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
मुंबई महापालिकेच्या या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केले जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक कार्यालयात आवश्यक तांत्रिक सुविधा आणि मनुष्यबळ तैनात केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

