पुढील तीन दिवस कोकण,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई/भारतीय हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.मुंबई , ठाणे, पालघर , रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता असून फ्लॅश फ्लडचा धोका आहे. नद्यांच्या प्रवाहावर लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही सांगितले आहे.प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष २४तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप, जुन्या धोकादायक इमारतींसाठी सुरक्षा उपाय, वीज व रस्ते दुरुस्ती पथक तैनात करण्यासही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मध्यम धरणांचा साठा व विसर्ग नियमित तपासण्यास सांगितले आहे.
संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपत्ती पूर्व सूचना एस एम एस, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावेत, वीज पडत असताना झाडाखाली थांबू नये, पूरस्थितीत नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत स्थानिक निवारा केंद्रांचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास व पर्यटन टाळावे.
