लॉकडाऊन/अनलॉकच्या वातावरणात दूरदर्शनवर रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या रामायण, महाभारत या सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या ऐतिहासिक, पौराणिक मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले. रामानंद सागर यांची श्रीकृष्ण ही मालिका तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सर्वदमन बँनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका वठविली असून आता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करीत आहेत. श्रीकृष्णाने आपले विराट स्वरूप दाखविले आहे आणि जीवन जगण्याची संपूर्ण कार्यपद्धती विषद केली आहे. यात निष्काम कर्मयोग हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. श्रीमद्भगवद्गीता हे संपूर्ण जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन, दिशा दिग्दर्शन आहे. आजच्या कलीयुगात हे सर्व सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असं असलं तरी समाजात आजही काही व्यक्ती अशा आहेत की ज्यायोगे भगवान श्रीकृष्ण यांचा संदेश तंतोतंत अंमलात आला आहे, असे दिसून येते. यातच एक व्यक्ती म्हणजे कृष्णाभाऊ शेवडीकर ! माझ्या पेक्षा एकवर्ष दहा दिवस कृष्णाभाऊ मोठे असले तरी ते अन्य मित्रांप्रमाणे मला ‘गुरुजी’, ‘गुरुवर्य’ म्हणतात , हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. कृष्णाभाऊ हे खरोखरच निष्काम कर्मयोगी आहेत. मराठवाड्यात नांदेड येथून श्रमिक एकजूट हे दैनिक गेल्या पन्नास वर्षापासून नित्यनियमाने ते चालवितात आणि संपूर्ण मराठवाडा त्यांनी व्यापलेला आहे. पत्रकार हा खरा समाजसेवक असतो. तो समाजाचा आरसा असतो. आपण बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची परंपरा सांगतो. अगदी आताआतापर्यंत पत्रकारिता कशी करावी याचा मापदंड असलेले दिनू रणदिवे, मधू शेट्ये काळाच्या पडद्याआड गेले. ‘पत्रकारिता हे सतीचे वाण’, ‘पत्रकारिता म्हणजे असिधारा व्रत’ हे आता केवळ बोलण्यापुरते, ऐकण्यापुरते म्हणावे लागेल. पण नाही, हे जर खऱ्याअर्थाने आपल्याला पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल. कृष्णाभाऊ यांचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा, कधीही कुणावर रागावलेले त्यांना पाहिलेले नाही. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार. आणि हे मी तुमच्या साठी केले असे कधीच ते दाखवून देणार नाहीत, भासवून देणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण यांचा कर्मण्येवाधिकारस्ते हा मूलमंत्र ते खऱ्याअर्थाने पाळतात म्हणण्यापेक्षा तो मंत्र ते खऱ्याअर्थाने जगत आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि आहुतिकार वसंतराव त्रिवेदी म्हणजे माझे वडील यांच्या समवेत कृष्णाभाऊ शेवडीकर आणि रवींद्र बेडकीहाळ यांनी पत्रकार परिषदेत एकत्र काम केले आहे. सोलापूरच्या रंगाआण्णा वैद्य, अमरावती चै बाळासाहेब मराठे, बेळगावच्या बाबूराव ठाकूर, पुण्याचे वसंतराव काणे, नांदेडचेच सुधाकरराव डोईफोडे, सूर्यकांता पाटील, रायगडच्या मिनाक्षीताई पाटील, जळगावचे ब्रिजलालभाऊ पाटील, धुळ्याचे भाई मदाने, मुंबई चे कुमार कदम, यशवंत उर्फ नाना मोने, नाशिक चे चंदुलाल शाह अशा अनेकांबरोबर कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. स्वतः चे दैनिक एकीकडे नियमित चालवितांनाच दुसरीकडे पत्रकारांच्या, वर्तमानपत्रांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी शेवडीकर बेडकीहाळ जोडीने अथक परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तसेच संपादक परिषद सुद्धा यशस्वी पणे हे दोघे सांभाळतात. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने माझी शिफारस केल्यामुळे मला राज्य अधिस्वीकृती समितीवर काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने यदूनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली कृष्णाभाऊ शेवडीकर, रवींद्र बेडकीहाळ, विलासराव मराठे, सुधीर महाजन, प्रकाश कुलथे, धनंजय जाधव, प्रसाद काथे, विनोद जगदाळे, शंतनू डोईफोडे अशा अनेकांबरोबर काम करण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या स्वभाव गुणांचा परिचय झाला. याच निमित्ताने मी श्रमिक एकजूट या दैनिकाचा लेखक म्हणून परिचित झालो. कृष्णाभाऊ यांच्या श्रमिक एकजूट मुळे (आधीच ज्या मराठवाड्यात दैनिक सामना मुळे परिचित झालो होतो तो आणखीनच) मराठवाड्यात माझा नावलौकिक सर्वदूर पोहोचला. शतकवीर संसदपटू केशवराव धोंडगे या महाराष्ट्रात एक काळ गाजवलेल्या नेत्यांनी ४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी मला भ्रमणध्वनी वरुन, “देवा, आपण आमची जाणीव ठेवलीत” असे सांगितले. माझी पत्रकारिता खऱ्याअर्थाने धन्य झाली. ज्या केशवराव धोंडगे यांनी लोकसभा आणि विधानसभा गाजविल्या, त्या सभागृहात त्यांचे कार्य जवळून पाहण्याची संधी सामनामुळे उपलब्ध झाली. त्याच केशवरावांकडे त्यांच्याच शेतकरी कामगार पक्ष आणि सरकारने दुर्लक्ष केले ही बाब मी श्रमिक एकजूट च्या माध्यमातून समोर आणतांना ‘दिवंगतांची जन्मशताब्दी जोरात आणि हयात शतकवीर कोनाड्यात’ असे प्रहार केले. या बद्दल केशवरावांनी माझे कौतुक करुन शाबासकीची थाप मारली, याचे संपूर्ण श्रेय खऱ्याअर्थाने कृष्णाभाऊ शेवडीकर यांनाच द्यावे लागेल. याच लेखावर दत्तात्रय कराळे या ज्येष्ठ पत्रकार यांची विस्तृत प्रतिक्रिया सुद्धा कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी श्रमिक एकजूट मध्ये प्रसिद्ध केली. विजय वैद्य, गिरीश त्रिवेदी, प्रवीण कारखानीस, वीणा गावडे, शशीकला रेवणकर, रेखाताई बोऱ्हाडे, प्रा. नयना रेगे, सुजाता जोग, जयंत करंजवकर, खंडुराज गायकवाड, किशोर आपटे, सुहास पटवर्धन, विजय शिंदे, हेमंत थोरवे, वंदना साळसकर साखळे, अजय वैद्य, मनीषा रेगे, दिलीप मालवणकर ही मंडळी सुद्धा श्रमिक एकजूट च्या परिवारात जोडली गेली. निष्काम कर्मयोगी म्हणून मी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना म्हणतो त्याचे कारण त्यांनी आपला आदर्श डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना मानले आहे. महाराष्ट्र भूषण बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा जे खऱ्याअर्थाने चालवितात त्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना आजच्या भाषेत आपला आयडॉल, रियल हिरो म्हणून जर कृष्णाभाऊ आपला आदर्श मानत असतील तर कृष्णाभाऊ हे निष्काम कर्मयोगी निश्चितच बनू शकतात, नव्हे मी तर त्यांना नक्कीच ही बिरुदावली त्यांच्या नावापुढे लावेन. अशा या ज्येष्ठ पत्रकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ विनम्रपणे नाकारला आहे. सोयी, सवलतीच्या मागे धावणाऱ्यांच्या जमान्यात विनम्रपणे लाभ नाकारणारा कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या सारखी व्यक्ती निश्चितच आदरास पात्र ठरते अभिमानास पात्र ठरते. श्रमिक एकजूट आणि कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या मुळे नांदेड येथील डॉ. विलास कुमठेकर यांच्या सारख्या एका प्रकांडपंडिताचा परिचय झाला. त्यांचे आणि माझे सतत बोलणे सुरु असते. या बोलण्यातून कृष्णाभाऊ शेवडीकर यांचा संदर्भ, उल्लेख हमखास येणारच. नांदेड चे हे दोघे राम लक्ष्मण म्हणायला हवेत. अशा या निष्काम कर्मयोगी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, श्रमिक एकजूट ची पताका दिमाखदार पणे फडकत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा !- योगेश वसंत त्रिवेदी,
Similar Posts
.. आणि योगेश वसंत त्रिवेदी यांची ‘गुरुजी’ अशी ओळख झाली
■ सदानंद शिंदे★ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे दुसरे पुस्तक ‘गुरुजी’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. मंत्रालय आणि विधानमंडळ परिसरात तसेच विविध राजकीय पक्ष कार्यालयांपासून सर्वत्र योगेश वसंत त्रिवेदी हे ‘गुरुजी’ म्हणून परिचित आहेत. परंतु ‘गुरुजी’ हे नांव कसे रुढ झाले ? ज्येष्ठ पत्रकार सदानंद गौरु शिंदे यांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी योगेश वसंत त्रिवेदी…
३० वर्षांच्या न्यायालयीन सेवेतून सूर्यकांत बंडू जाधव निवृत्त
सातारा- औद्योगिक व कामगार न्यायालय सातारा येथे ३० वर्ष सेवा बजावल्यानंतर सूर्यकांत बंडू जाधव हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेऊन सेवा बजावली . अध्यात्म आणि भक्ती मार्गातील सूर्यकांत जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आपल्याभोवती मोठा जनसमुदाय गोळा केलेला आहे. निवृत्ती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार…
आषाढी एकादशी निमित्त-खेळ मांडियेला
महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत.मध्ययुगीन प्रबोधन…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न
मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक…
दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात अनेक मध्यम व छोट्या बँकांनी उत्तम नफा कमावलेला आहे. तसेच काही बँकांचे एकत्रीकरणही यशस्वी झालेले आहे. खाजगीकरण करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे जाहीर करून याबाबतचे आवश्यक पाऊल केंद्राने नुकतेच टाकलेले…
