मुंबई:
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आणि मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेविरुद्ध (SIR) मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने निदर्शने करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व पोलिसांकडून स्पष्ट परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही, आयोजकांनी न जुमानता हे आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान सार्वजनिक वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होणे, विनापरवानगी लाऊडस्पीकरचा वापर करणे आणि बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे यांसारखे नियमभंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्यात आले असून, आंदोलनाचे आयोजक अभिजित दिपके यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर आणि तब्बल ४०० ते ५०० अज्ञात आंदोलकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग आणि बेकायदेशीर जमवाजमव केल्याप्रकरणी FIR नोंदवला असून, सध्या सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
