मुंबई -खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी अंदाजे १० ते १५ पालकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही माहिती दलित पँथरचे पक्षप्रमुख डॉ. स्वप्नील ढसाळ आणि राष्ट्रीय अध्यक्ष संगीता ढसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीमार्फत विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण व उज्ज्वल करिअरच्या संधींचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सांगितलेल्या सुविधा व पूर्ण प्रशिक्षण न देता पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत किमान पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी खारघर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला असून, आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळ झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.सुरुवातीला रजिस्ट्रेशन आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली लाखो रुपये घेतले जात होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना परदेशात किंवा इतर ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षण सुरू न करता विविध कारणे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप डॉ ढसाळ यांनी केला.
पालक संजय वैद्य यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीला पायलट प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला होता आणि त्यासाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपये भरले होते. मात्र अनेक महिने उलटूनही प्रशिक्षण व्यवस्थित सुरू झाले नाही. उलट विविध कारणे देऊन आणखी पैसे मागितले जात होते. संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
काही पालकांनी असा आरोप केला आहे की, विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली बोलावून त्यांच्या फोटो आणि व्हिडिओ काढले जात होते आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात होता. या प्रकरणात अनेक पालकांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली असून गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणात काही दोन महिला आरोपींना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार दुबईमध्ये बसून भारतात हा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले असून पालकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात अशा प्रकारची फसवणूक पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी डॉ ढसाळ यांनी केली आहे.
याबाबत डॉ. स्वप्नील ढसाळ आणि संगीता ढसाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि भवितव्याशी संबंधित अशा प्रकारच्या फसवणुकीला कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. पीडित पालक व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी दलित पँथर संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवेल.

