मुंबई/मुंबई महापालिका अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होतो. मात्र महापौर निवडणुकीसह, स्थायी समिती व अन्य समिती अध्यक्ष तसेच सदस्य निवडणूक प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. अखेर हा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समिती सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद असण्याची शक्यता आहे.
२०२५-२६मध्ये ७४ हजार ४२७कोटी ४१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. २०२४-२५च्या तुलनेत या रकमेत १४.१९ टक्के वाढ होती. यंदाचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.२०२५-२६च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी ४३ हजार १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर महसुली खर्च हा ३१ हजार २०४ कोटी ५३ लाख रुपये होता. मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांचा खर्च भागवण्यासाठी महापालिकेला निधीची गरज आहे. २०२४-२५मध्ये महापालिकेला १२ हजार ११९ कोटी ४७ लाख रुपये अंतर्गत कर्ज घ्यावे लागले होते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कर्जाचा आकडा १६ हजार ६९९ कोटी ४१ लाख रुपये होता. मुदत ठेवीतूनच ही रक्कम उचलावी लागत असल्याचेही समोर आले होते. यंदाही आर्थिक परिस्थिती, मुदत ठेवी, रस्ते, आरोग्य आदी पायाभूत स सुविधांसाठी होणारी तरतूद यांचे चित्र अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

