मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग हद्दीत घाटकोपर परिसरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल BMC च्या पूल विभागाकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या दोन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पूर्व बाजूकडील सर्व कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, तर पावसाळ्यापूर्वी ३१ मे २०२६ पर्यंत आवश्यक कामे पूर्ण करावीत, असे बांगर म्हणाले. पश्चिम बाजूला बाधित निवासी-वाणिज्य इमारती हटविणे आणि रस्त्यांची नवीन रेषा निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामांना चालना द्यावी, असा आदेशही त्यांनी दिला.पूर्व बाजूला पोहोच मार्ग (सॉलिड अप्रोच) आणि पृष्ठीकरणासह सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. पश्चिमेला सहा खांब उभारले असून, उर्वरित चार खांब, स्पॅन आणि पोहोच मार्ग बाकी आहेत. वाहतूक वळवणे हे मोठे आव्हान असल्याने, दोन्ही बाजूंचे रस्ते प्रथम पूर्ण करून वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करणार, त्यानंतर उर्वरित कामांना गती मिळेल.प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोतेसह अधिकारी-अभियंते उपस्थित होते.

