बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु होती. पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती. त्यामुळे जय पवार निवडणूक लढवणार की नाही, याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेच याबाबतच्या सस्पेन्सवर मोठा पडदा टाकला आहे. जय पवार नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. जय पवार यांच्या निवडणूक लढण्याबाबात त्यांनी आज माहिती दिली. “जयबाबत मी तसं काही ऐकलं नाही आणि तसं काही होणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले त्याबाबात अजित पवार यांनी सांगितले की,”पार्थ पवार समोर येत नाहीत. मी भूमिका मांडली, त्याच्या बापाने मांडली. मी मीडियासमोर बोललो. माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. मी दुसऱ्या दिवशी भूमिका मांडली.”मधल्या काळात काही घटना घडल्या, मी माझी भूमिका स्पष्ट मांडली. चौकशी सुरू झाली आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर येईल. 1 रुपयाचा व्यवहार न करता कसा कागद होऊ शकतो, हे आजपर्यंत माझ्या लक्षात आले नाही. ज्याने ही नोंदणी केली, त्याने कशामुळे केले हे एका महिन्यात कळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत नेमले आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.मागे माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला, त्याला १५-१६ वर्षे गेली. निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात. पारदर्शकपणे काम करायचे, पण ते झाले की लगेच बारामतीतील कुठल्या जमिनीचे कागद काढायला लागतात. माझ्या नावाचा वापर करून जवळचे कार्यकर्ते किंवा नातेवाईकांनी काही सांगितले तरी ते नियमात असेल तरच अधिकाऱ्यांनी करावे. मी सर्व वर्ष अधिकाऱ्यांना हे आवाहन करतो”, असं अजित पवार म्हणाले.शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही सुसंस्कृत म्हणून राज्यात राजकारण करतो.” अशा शब्दांत अजित पवारांनी आरोपांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

