ठाणे/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत अनेक ठिकाणी वाद निर्माण झालेले असल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे परिणामी ज्या ठिकाणी विरोधक अधिक प्रबळ असतील त्या ठिकाणीच महायुती म्हणून लढायचे असा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते तर इतर ठिकाणी मात्र स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपाला घुसखोरी करायची आहे त्यामुळे भाजपा स्वबळाची चाचपणी करीत आहे तर शिंदे सेनेचे नेतेही ठाण्यात भाजपाला शह देण्यासाठी शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे या मागणीबाबत कार्यकर्ते आक्रमक आहेत.
दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच युतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार? ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार ? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात येत आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबात उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.

