नालासोपारा:नालासोपारा येथील बहुचर्चित आरीफ शेख आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आणि पोलिसांसोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आरीफ शेख हा केवळ एक ‘मोहरा’ आहे. या संपूर्ण प्रकरणामागे ‘लव्ह जिहाद’ आणि ड्रग्स माफियांचे मोठे नेटवर्क सक्रिय आहे. हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि त्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचा छळ करणे, हे या टोळीचे मुख्य कृत्य असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आणि यामागील सर्व मुख्य दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
