ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक : ‘गुरुजी’ !

-विक्रांत विजय वैद्य (बोरीवली, मुंबई). ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेश त्रिवेदी यांच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘पासष्टायन’ या पुस्तकानंतर ‘गुरुजी’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे, ही आत्यंतिक आनंददायी घटना आहे. पण एका गोष्टीची खंत मात्र मनात जाणवतेय, श्री. योगेश त्रिवेदी यांना ‘गुरुजी’ ही उपाधी देणारे ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचा या कोरोनाकाळात करुण अंत झाला. आज ‘गुरुजी’ पुस्तकाच्या प्रकाशनासमयी त्यांची अनुपस्थिती अस्वस्थ करीत आहे. मार्च, २०१९ ते ऑक्टोबर, २०१९ या सुमारास झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘गुरुजी’ हे राजकीय सदर ‘तरुण भारत संवाद’ मध्ये प्रसिद्ध होत होते, या ‘गुरुजी’ या स्तंभ लेखांचे एक संग्रहित पुस्तक राजकीय क्षेत्रात आणून आजच्या तरुण पिढीला जुन्या घटनांचा धांडोळा घेण्यास प्रवृत्त करावे हा मूळ उद्देश या पुस्तकाच्या प्रसिद्धीमागे आहे. वास्तविक पाहता उपरोक्त सदर हे निवडणूक काळातील विश्लेषणात्मक सदर असले तरी या पुस्तकामध्ये अनेकानेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक राजकीय घटनांचा सूक्ष्म व तपशीलवार संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील साहित्यिक उंची वाढविलेली आहे.
या पुस्तकामध्ये अनेक राजकीय घटना, राजकीय नेते, निवडणुका आणि त्यांच्या निकालानंतर राजकारणातील बदलणारी समीकरणे यापासून ते अलिकडील सन २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पुनर्रचित झालेले मतदारसंघ या सर्व बाबींचा सनावळीसह सविस्तर ऊहापोह करण्यात आलेला आहे.
सनदी अधिकारी आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश, त्यांनी लढविलेल्या निवडणुका या विषयाच्या अनुषंगाने स. गो. बर्वे यांनी व्ही. के. कृष्णमेनन यांच्या विरोधात लढविलेली निवडणूक अशा काही ऐतिहासिक निवडणुकांचा तपशील, तत्कालीन निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्यावरील लेख तसेच सन २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पुनर्रचित झालेले मतदारसंघ यामध्ये तत्कालीन निवडणूक आयुक्त श्री. नंदलाल यांची भूमिका या वास्तवस्पर्शी विषयांवर आधारित लेख देखील अत्यंत वाचनीय व मर्मग्राही आहेत.
श्री. योगेश त्रिवेदी यांनी आणीबाणीचा काळ, समाजवादी चळवळ, जनता पक्षाची स्थापना इ. महत्त्वपूर्ण घटना अतिशय जवळून अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे साथी एस. एम. जोशी यांचा साधेपणा, दत्ताजी ताम्हाणे यांच्या त्यागामुळे रामभाऊ म्हाळगी यांना ठाणे लोकसभा मतदारसंघात मिळालेली संधी, आणीबाणीचा काळ, नांगरधारी शेतकरी या चिन्हाने अधोरेखित झालेला जनता पक्ष आणि या पक्षाच्या अधिवेशनाबाबतचे वर्णन, विस्मृतीत गेलेल्या जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या आठवणी या पुस्तकाच्या माध्यमातून नव्यानेच जागृत झालेल्या आहेत.
‘आहुति’ हे साप्ताहिक नि:पक्षपाती राहण्याकरिता ‘समाजाय इदम न मम’ या ब्रीदवाक्याप्रमाणे वसंतराव त्रिवेदींचे कटिबद्ध असणे तसेच ही परंपरा आजही संपादक गिरीश त्रिवेदी यांनी अबाधित ठेवणे याची रोचक माहिती आपल्याला ‘प्रा.रामभाऊ कापसे यांचा प्रस्ताव वसंतरावांनी फेटाळला’ या लेखात विस्तृतपणे आढळते.
अंबरनाथ येथे निवासस्थान आणि एकूणच ठाणे जिल्हा ही श्री. योगेश त्रिवेदी यांची कर्मभूमी असल्यामुळे सहाजिकच शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ कसा खेचून आणला यात परिसीमनपूर्व ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांविषयीचा अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे.
समाजवादी नेते आणि ख्यातनाम संसदपटू बॅ.नाथ पै, प्रा. मधु दंडवते, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे यांच्या राजकीय वाटचालीतील तसेच निवडणुकींच्या संदर्भातील अनेक वस्तुस्थितीदर्शक किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. राष्ट्र सेवा दलाचे अनेक सैनिक पुढे शिवसैनिक झाले याचा परिचय देखील आपल्याला या निमित्ताने होतो.
श्री.योगेश त्रिवेदी, श्री.विजय वैद्य, श्री. प्रकाश जोशी, श्री. अजय वैद्य, श्री.अनिकेत जोशी, श्री. दिलीप चावरे, श्री. अजीज एजाज यांसारखे काही ज्येष्ठ पत्रकार हे मंत्रालयात आणि विधानभवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी नेहमीच विनम्रतेने वागतांना पाहतो. परंतु श्री. योगेश त्रिवेदी, श्री. विजय वैद्य, श्री. अजय वैद्य, श्री. अजीज एजाज हे अधिकारी तसेच सामान्य कर्मचाऱ्यांसोबतही वैयक्तिक स्नेह टिकवून असतात. मग ते विधानभवनातील प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षा कर्मचारी असोत किंवा मंत्रालय आणि विधानभवनातील उपाहारगृह असो अथवा विधिमंडळाचे ग्रंथालय. यांचं स्वागत सदोदीत उत्साहात व सहर्ष होतं, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
सळसळत्या उत्साहासह श्री. योगेश त्रिवेदी यांची धावपळ आपल्याला विधानभवन, मंत्रालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मराठी पत्रकार संघ या परिसरात नियमित पहायला मिळत असते. विधानभवन आणि मंत्रालयात अनेक राजकीय नेतेमंडळी, मंत्री महोदय, सनदी अधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन मग तेथील अधिकारी, कर्मचारी यासह अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची देखील ते आस्थेने विचारपूस करतात. यातूनच आपल्याला ‘विधिमंडळाला गवसलेला सर्वपैलू हिरा : भाई सुभाषचंद्र मयेकर’, ‘महाराष्ट्र विधानमंडळाचा चालता बोलता इतिहास : बाळासाहेब उर्फ बा.बा. वाघमारे’, ‘मजुरापासून अवर सचिवापर्यंत झेपावले: मरगळ झटकून काम करणारे नामदेवराव मरगळे’, ‘आणखी एक शरद पवार, हेही बारामतीकर’ या लेखांमध्ये विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तिमत्वांचा परिचय होतो.
काही निवडणुका आणि त्यांचे ऐतिहासिक निकाल अगदी सहजपणे विस्मृतीत जातांना दिसून येतात अथवा त्याचा उल्लेखही अलीकडे अभावानेच केलेला दिसतो. परंतु श्री. योगेश त्रिवेदी यांनी १९९८ सालातील लोकसभा निवडणूक आणि त्यात चार मतदारसंघामध्ये आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांचा झालेला विजय या ऐतिहासिक घटनेवर लेख लिहून ‘१९९८ सालची ही निळाई शेवटचीच ठरणार ?’ या लेखात आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी १९९८ साली रामदास आठवले हे उत्तर मध्य मुंबईतून, रा. सू. गवई हे अमरावती मधून, प्रा. जोगेंद्र कवाडे हे चिमूर मतदारसंघातून आणि प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडून आले हा मतदारांनी घडविलेला चमत्कार आहे ही बाब विशेषत्वाने अधोरेखित केली आहे.
भारताचे माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे पद भूषविलेल्या सन्माननीय व्य्क्तींचे नांव, छायाचित्र, कार्यकाल यांची तपशीलवार माहिती आहे.
मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे पहिले मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांची देखील छायाचित्रे, कार्यकाल यासह अद्ययावत माहिती या पुस्तकात आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजमितीपर्यंतचे विधानपरिषद , विधानसभा यांचे सभापतीपद आणि अध्यक्षपद भूषविलेल्या सन्माननीय सभापती आणि अध्यक्षां विषयीचे सर्व तपशील, कार्यकाल आणि त्यांचे छायाचित्र यांची माहिती, विरोधीपक्षनेते, यांच्या देखील नांवाचा तपशील, कार्यकाल व छायाचित्र यांची माहिती आहे.
भारतीय राज्यघटनेची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती ‘भारतीय राज्य घटना : एक दृष्टीक्षेप !’ भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया या लेखामध्ये आहे.
आज आपल्याला एक रुपयाचे महत्व अजिबात वाटत नाही परंतु संसदीय लोकशाही आणि संसदीय कार्यप्रणाली यामध्ये एक रुपयाला विशेष महत्त्व आहे हे सांगतांना श्री. योगेश त्रिवेदी यांनी लोकसभा / विधानसभा कामकाजामध्ये एक रुपयाची कपात सूचना या संसदीय आयुधाचे महत्त्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय राजमुद्रेसह कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ या लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वास्तूंची छायचित्रे आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी साकारलेले योगेश त्रिवेदी यांचे अर्कचित्र असलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक असून उदय पै यांनी संपूर्ण सजावटीसह केलेली पुस्तकाची छपाई आणि यातील छायाचित्रे देखील अतिशय सुंदर आहेत.
‘गुरुजी’ हे पुस्तक म्हणजे आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ऐतिहासिक वैभवशाली आणि गौरवशाली घटनांचा सनावळीसहित उल्लेख असलेला महत्त्वपूर्ण सांस्कृतिक दस्तावेज आहे. हे पुस्तक पत्रकार तसेच राज्यशास्त्राचे विद्यार्थी असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
‘गुरुजी’ या पुस्तकाला हार्दिक शुभेच्छा -विक्रांत विजय वैद्य, 99699 47389

error: Content is protected !!