ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा

ठाणे, ता. २०. ठाणे महापालिकेच्या सद्यस्थ‍ितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे (horsepower) होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला 100 द.ल.लि प्रतिदिन वाढीव पाणी मिळणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज पिसे टेमघर प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नमूद केले.

ठाणे महापालिकेस मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पिसे प्रकल्प व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापौर नरेश म्हस्के यांनी प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर पल्लवी कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, नगरसेवक गुरमुखसिंग स्यान, प्रकाश शिंदे, सुधीर कोकाटे, संध्या मोरे, एकनाथ भोईर, संजय वाघुले, राजेंद्र साप्ते, जयेश वैती, पुजा करसुळे तर प्रशासनाच्या वतीने नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार, विकास ढोले, हनुमंत पांडे, अतुल कुलकर्णी, स्टेम प्राधिकरणाचे अनिल चौधरी, संकेत घरत आदी उपस्थित होते.

 भातसा धरणातून अतिरिक्त 100 द.ल.लि पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाकडे ठाणे महापालिकेमार्फत मागणी करण्यात आलेली आहे, ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करुन ही मागणी मान्य करुन घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची वाढती मागणी पाहता, भातसा धरणातून अतिरिक्त वाढीव पाणी घेणेबाबत युद्धपातळीवर काम सुरू आहे. सद्यस्थितीतील पाणी पुरवठा व नव्याने उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करून येत्या आठ दिवसात सादर करण्याची सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला केली. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे सोबत बैठक घेऊन पाणीवाटपाच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल असेही महापौर यांनी यावेळी नमूद केले. तसेच स्टेम प्राधिकरणाकडूनही वाढीव पाणी घेऊन ठाण्यातील पाणी समस्या पुर्णपणे सोडविण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे असेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. पाणी ही अत्यावश्यक सेवा असून ठाण्यातील नागरिकांना योग्य प्रकारे पाणी पुरवठा होईल या दृष्टीने टप्याटप्याने काम सुरू राहिल अशीही माहिती या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौरांनी दिली.

error: Content is protected !!