ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

…जेव्हा तिकीटांचे दर सेन्सेक्सप्रमाणे बदलतात

मुंबई, दि. २ ( क्री. प्र.)- वानखेडेवर रंगलेल्या हिंदुस्थान-श्रीलंका सामन्याचे तिकीट मोठा वशीला लावल्यानंतरही पैशाने विकत मिळत नव्हत्या. यावरून तिकीटांची मागणी किती प्रचंड होती याचा अंदाज साऱ्यांनाच आला होता. मात्र आज सामना सुरू होताच काळ्याबाजारात तिकीटांचे दर अक्षरशा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सप्रमाणे क्षणाक्षणाला बदलत असल्याचे एक वेगळाच अनुभव आला. सकाळी १० वाजल्यापासून मुंबईची लोकल क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरली होती आणि चर्चगेट स्टेशन असो किंवा मरीन लाइन्स. दोन्ही ठिकाणी काळ्याबाजारात तिकीट विक्रीला अक्षरशः उधाण आले होते. चक्क पाचपट दरात सामन्याच्या तिकीटी विकल्या जात होत्या. अडीच हजारांची दहा-बारा हजारांना, साडे तीनच्या वीस हजारांना. पण हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळताच तिकीटांचा दर दोनेक हजारांनी वाढला. कारण फलंदाजीला मुंबईकर रोहित शर्मा उतरणार होता. तिकीटांचे वाढलेले दर एका क्षणात कोलमडलेसुद्धा. रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि तिकीटांचे दर पुन्हा दहा हजारांवर आले. एवढेच नव्हे तर काहींनी तीनपट दरातही तिकीटे विकायला सुरूवात केली. पण जसाजसा खेळ पुढे सरकू लागला, सामन्याची तिकीटे आपल्याच गळ्यात पडतील, या भीतीने ब्लॅकर्स अडीचचे पाच बोलू लागले. सामना सुरू होऊन २५ षटके झाली तरी शेकडो चाहते तिकीटांसाठी धडपडत होते. ब्लॅकर्सकडे भाव कमी करण्याची विनंती करत होते. मात्र गिल बाद होताच तिकीटांचे दर मुद्दल भावापेक्षा कमी झाले आणि विराटची विकेट जाताच ब्लॅकर्स उरलेली तिकीटे अर्ध्या किमतीत विकून आपले नुकसान कमी करण्यासाठी धडपडताना दिसले.
गिल-कोहलीनंतर अर्ध्या किमतीत तिकीटे घेऊन मैदानात गेलेल्या चाहत्यांना श्रेयस अय्यरचा झंझावात पाहाण्याचे भाग्य लाभले. विशेष म्हणजे पहिल्या डावानंतर हिंदुस्थानची गोलंदाजी पाहण्यासाठीही काही क्रिकेटवेडे तिकीटांची वाट पाहात होते. तेव्हा हिंदुस्थानची फलंदाजी पाहून परतणाऱ्या काही चाहत्यांनी अशा चाहत्यांना आपली तिकीटे चक्क मोफत देऊन पुण्य कमावले.

कॉम्प्लीमेंट्री तिकीटांचा काळाबाजार

आजच्या सामन्याची तिकीटे कुठेही मिळत नव्हती. मात्र काळ्याबाजारात चक्क कॉम्प्लीमेंट्री तिकिटे ब्लॅकनी विकली जात होती. जी तिकीटे सन्माननीय लोकांना देण्यासाठी छापली गेली होती, अशी कॉम्प्लीमेंट्री तिकीटे मोठ्या संख्येने काळ्याबाजारात कशी विकली जात होती. हा मोठा प्रश्न आहे. ब्लॅकर्सला याबद्दल विचारले असता, तो सरळ म्हणाला, तुला तिकीट पाहिजे असेल तर घे, नाहीतर पुढे हो. तुला काय करायचेय, मला तिकीटे कुठून मिळालीत त्याबद्दल? आमची ओळख वरपर्यंत आहे. आम्हाला कोणतीही तिकीटे सहज मिळतात. पैसे के आगे झुकती है दुनिया. दाम अच्छा मिला तो कोई भी अपना तिकट बेचेगा ना! धक्कादायक म्हणजे ब्लॅकर्सकडे शेकडोच्या संख्येने कॉम्प्लीमेंट्री तिकीटे उपलब्ध होती आणि ती त्याने मोठ्या किमतीत विकलीसुद्धा. नेमकी ही तिकिटे कोणत्या मार्गाने ब्लॅकर्स पर्यंत पोहोचतात, हा संशोधनाचा विषय आहे.

error: Content is protected !!