हिम्मत असेल तर वाराणसीत मोदींना हरवून दाखवा -ममता बेनर्जी यांचे कॉंग्रेसला उघड आव्हान
मुर्शिदाबाद- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी म्हणाल्या की, ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ४० जागाही मिळवू शकेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.’
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता यांनी हे वक्तव्य केलं आहे. तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे
बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये आज एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ”मला माहित नाही की काँग्रेस 300 पैकी ४० जागा जिंकेल की नाही. मग हा अहंकार का? तुम्ही बंगालला आलास पण मला सांगितलंही नाहीस. आम्ही इंडिया आघाडीचा भाग आहोत. हिम्मत असेल तर वाराणसीत भाजपला हरवून दाखवा, पूर्वी जिथे जिंकायचे तिथेही हरले.”
त्या म्हणाल्या की, ”काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये आली होती. पण मला त्याची माहितीही देण्यात आली नाही. आम्ही इंडिया आघाडीचे मित्र आहोत आणि मला माझ्या पक्षाच्या नेत्यांकडून याची माहिती मिळाली.”