[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिंदे – अजितदादा गटात संघर्ष पेटणार ?


मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं. विशेष म्हणजे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन भाजपमध्ये प्रचंड धुसफूस असल्याची तेव्हाच चर्चा होती. कारण त्यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. तर अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन पडद्यामागे बरीच खलबतं झाली. त्यानंतर अखेर अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या बदल्यात दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असली तरी पुण्यात सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसतंय. कारण पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीमधील शिंदे गट आणि भाजपच्या सदस्यांनी अजित पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठं राजकीय ‘महाभारत’ घडण्याची चिन्हं दिसत आहेत.
अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतलाय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांच्या याद्यांना मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यात आलीय, तसेच अजित पवार त्यांच्या गटातील लोकांना झुकतं माप देत असल्याचा भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा आरोप आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना ८०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ती कामं रद्द करा, असं निवेदन सदस्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलंय.
यामध्ये भाजपा आणि शिंदे गटाला नाममात्र फंड उपलब्ध करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील आणि जीवन आप्पा कोंडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.

error: Content is protected !!