ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

मोबाईल-टीव्ही-इंटरनेट म्हणजे मृत्युला कवटाळणे ! भावी पिढीने विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

मुुुंबई (दीपक शिरवडकर)ः मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. विविध कामांचे नियोजन करण्याची आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यातच खोटे बोलण्याची प्रवृत्ती मोबाईल संस्कृतीमुळे वाढत आहे. नवी पिढी तर अक्षरशः मोबाईलच्या एवढी अधीन झाली आहे की, त्यांच्यात विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलचे नको ते व्यसन आजच्या पिढीला लागले असून तासन्तास मोबाईलवर बोलत रहाणे, रात्री-अपरात्री संदेश पाठविणे, मोबाईलच्या नादात जागरण करणे, अभ्यास न करणे, एवढेच नाही तर समोरची व्यक्ती, प्रसंग याचे कोणतेही गांभीर्य न राखता बोटे आणि डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळवून ठेवणे, काहीजण तर कानात हँड्स फ्री घालून गाणी एैकत असतात जेणेकरून श्रवणशक्तीवर परिणाम होत आहे, आणि बहिरेपणा वाढत आहे. शरीराच्या नैसर्गिक सवयी बदलून चुकीच्या सवयी लागल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते, चिडखोरपणा वाढीस लागतो, एकूणच ह्या मोबाईल संस्कृतीमुळे भावीपिढी विविध आजाराचे बळी ठरण्याचाच धोका अधिक आहे असे तज्ञांचे मत आहे.
याबाबत पालकांनीही जागरूकता बाळगणे गरजेचे आहे. आपला पाल्य दिवसा-रात्री-अपरात्री तासन्तास मोबाईलवर अथवा इंटरनेटच्या माध्यमातून कोणाशी गप्पा मारतो, कोणत्या प्रकारचे, कोणाला आणि का एसएमएस करतो, सायबर कॅफेत जाऊन काय करतो, शाळेत किंवा कॉलेजला व्यवस्थित जातो का, अभ्यास कसा करतो, कोणत्या मित्र-मैत्रिणीत वावरतो, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कोणाच्या संपर्कात आहे, काही बनावट सोशल नेटवर्किंग साईट्वर पाल्य सक्रिय नाही ना, ऑनलाईन कोणावर दहशत निर्माण करीत नाही ना, याची कसून चौकशी करणे ही काळाची गरज आहे. परंतु याबाबत काही पालकही उदासीनच दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विश्‍वात प्रवेश केलेल्या आजच्या तरूण पिढीला स्वतःची विचारप्रक्रिया नाही किंवा आपले जीवन सुसह्य कसे होईल, समाजात आपला मानमरातब कसा राहील याबाबतची जबाबदारीही नाही. आपला वर्तमानकाळच नाही तर भविष्यकाळ कसा उज्ज्वल करता येईल याबाबतही काही ध्येय-धोरण नाही. याला पालकही तितकेच जबाबदार आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये, कारण अगदी लहान मुलांच्या हातात हजारो रूपयांचा मोबाईल घेऊन देणे काही पालकांना मोठेपणा वाटतो. पण त्याचे भविष्यातील दुष्परिणाम काय आहेत याची मात्र अशा पालकांना जाणीव नसते हीच खरी ग्यानबाची मेख आहे.
इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे कार्बनडाय ऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याची माहिती सेंटर फॉर एनर्जी एफिशियंट कम्युनिकेशन या संस्थेच्या संशोधकानी समोर आणली आहे. याचाच अर्थ असा की, इंटरनेटमुळे विश्‍वाचा विकास झाला आहे आणि होत आहे यात शंका नाही इंटरनेटमुळे भरपूर फायदा जरी होत असला तरी वायुप्रदूषणही होत आहे. इंटरनेट कार्बनडाय ऑक्साईड सारखा विषारी वायू जगात पसरवित आहे हे कटु सत्यही नाकारता येणार नाही.
मोबाईल बरोबरच टी.व्ही. पहाणे, लॅपटॉप, स्मार्टफोन, अँड्राइड फोन, कॉम्प्युटर, इंटरनेट अशा सोशल मीडियामुळेही आजची तरूण पिढी बिघडत चालली आहे. इंटरनेटच्या माध्यमामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवला जातो आणि त्यातून सायबर गुन्हे वाढत आहेत, फसवणूक होत आहे. मोबाईलमुळेही कित्येक मुलींची फसवणूक होत आहे. मोबाईलच्या अतिरेकी आणि आगाऊपणे होत असलेल्या वापरामुळे भविष्यात वंधत्व (मुल न होणे) येण्याचा धेाका वाढला आहे. तसेच मानसिक तणावही तितकाच वाढत आहे. काही घरात तर मोबाईलमुळे भांडणेही होताना दिसतात. अतिशय प्रभावी असणारी ही साधने विचारपूर्वक वापरून भविष्यातील धोके टाळणे ही खरी गरज आहे.
मोबाईलमधील विविध गेम्स, व्हॉट्सअप, चॅटिंग या प्रकारामुळे डोळ्याचा ओलावा कमी होऊन डोळ्यांचे आजार आजची तरूण पिढी ओढूण घेत आहे. डोकेदुखी, सुस्ती, भुक मंदावणे, अडखळणे, धडपडणे असले आजारही मागे लागत आहेत. हायपर टेन्शनचे शिकारही काही तरूण-तरूणी होताना दिसतात. रोज चार तासांपेक्षा अधिक वेळ टी.व्ही. बघणार्‍यांना कॅन्सर, डायबेटिस, न्यूमोनिया, लठ्ठपणा, ह्दयविकार, पार्किन्सन, फयू असे अनेक आजार होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे.
मोबाईलचा अतिरेकी वापर आजच्या तरूण पिढीने करू नये असेच तज्ञांचे मत आहे. मोबाईलच्या अतिरेकीपणामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणातही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना
सद्या सामाजिक, एैतिहासिक अशा सर्वसामान्य ज्ञानाची माहितीच नाही. मोबाईलच्या अति वापरामुळे भविष्यात वंध्वत्व येण्याचा धोकाही अधिक असून नव तरूण-तरूणीनी अपायकारक ठरणार्‍या ह्या आधुनिक टेक्नॉलॉजीला जरा दूरच ठेवणे गरजेचे आहे.
टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अती वापरामुळे डिजिटल सिकनेस किंवा सायबर सिकनेस सारखे असाध्य रोग होण्याचा धोका वाढला आहे. याकरता डोकदुखी, अर्धशिशी, आळस, थकवा अशा गोष्टी जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. डोळे, कान आणि मेंदू ह्या अतिशय नाजूक अवयवांवर ह्या टेक्नॉलॉजीचा विपरीत परिणाम होत असल्याने भावी पिढीने आगाऊपणा, अतिरेकीपणा सोडून विविध प्रात्यक्षिके आणि वाचन करून ज्ञानार्जन मिळवून एक चांगला नागरीक होण्याची स्वप्न मनाशी बाळगले पाहिजे.
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी आपल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे याचे भान रहात नाही. काही अति सुशिक्षित तर मोबाईलवर बोलताना रस्त्याने चालताना वेड्यासारखे हातवारे करीत चालताना पाहिले की, हसू येते. कधी कधी तर मोबाईलची रेंज मिळत नसेल तर घसा फोड करीत बोेंबलणारेही काही कमी नाहीत, याकरता केवळ आपतकालीन परिस्थिती असेल किंवा काही महत्वाचे बोलायचे असेल तरच मोबाईलचा वापर होणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!