ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रविश्लेषण

.. आणि योगेश वसंत त्रिवेदी यांची ‘गुरुजी’ अशी ओळख झाली

■ सदानंद शिंदे
★ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे दुसरे पुस्तक ‘गुरुजी’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. मंत्रालय आणि विधानमंडळ परिसरात तसेच विविध राजकीय पक्ष कार्यालयांपासून सर्वत्र योगेश वसंत त्रिवेदी हे ‘गुरुजी’ म्हणून परिचित आहेत. परंतु ‘गुरुजी’ हे नांव कसे रुढ झाले ? ज्येष्ठ पत्रकार सदानंद गौरु शिंदे यांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी योगेश वसंत त्रिवेदी यांचे ‘गुरुजी’ हे नामकरण केले. एप्रिल २०२१ च्या प्रारंभी सदानंद शिंदे यांनी याबद्दल सविस्तर लेख लिहिला. हा लेख ‘गुरुजी’ पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. परंतु दुर्दैवाने सदानंद शिंदे यांचे २५ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाने देहावसान झाले. त्यांचा हा लेख सर्वांच्या माहितीसाठी ! सदानंद शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!★
ऐंशीच्या दशकात मी पूर्ण वेळ पत्रकारितेत आल्यानंतर काही थोरामोठयांची ओळख झाली. त्यांचा सहवास लाभला. यातील काही जणांचे माझ्या पत्रकारितेतील स्थान मार्गदर्शक म्हणून आदराचे राहिले. अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांचे स्थान माझ्यासाठी सर्वात वरचे होते आणि आहे. माझ्या शालेय जीवनातील अभ्यासक्रमात ‘परोपकारी सदू’ असा धडा होता. त्याच्याशी काहीही संबंध नसला तरी माझ्या घरचे वा अत्यंत जिवलग मित्र मला सदू या नावाने हाक मारायचे. पण मला माझ्या जीवनात म्हणा अथवा पत्रकारितेत मला खरा ‘परोपकारी सदू’ सापडला तो ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्या रुपात! त्यांची माझी पहिली भेट झाली ती “श्री” साप्ताहिकाच्या कार्यालयात. माझे मित्र व अंबरनाथमधील जांभूळ गावाचे शिवसेनेचे सरपंच श्री. सुभाष पिसाळ यांच्यासोबत आलेल्या योगेशजी यांची पिसाळ यांनी ओळख करून दिली. त्यांनी एका मोठ्या पत्रकाराची भेट घडवून दिली, याची प्रचिती मला अनेकदा आली.

 १९९५ च्या आरंभी मी दै. 'नवाकाळ'चा प्रतिनिधी म्हणून मंत्रालय बिटला आल्यावर योगेशजी यांच्यासोबत ऋणानुबंध दिवसागणिक घट्ट होत गेले. 'श्री' साप्ताहिकात असताना अनेक राजकीय स्पेशल रिपोर्ट लिहिले असले तरी मंत्रालयात राजकीय बिटला मी नवखा तर होतोच शिवाय माझ्यासाठी राजकीय बातमीदारी हे एक आव्हान होते. मी मंत्रालय बिटला आलो तेंव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि १४ मार्च १९९५ ला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. या सरकारच्या आरंभापासून ते संपूर्ण काळात मला बतमीदारीत योगेशजी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मदत मिळत होती. मुख्यमंत्र्याचीच नव्हे तर अन्य मंत्री वा राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदांना पोहोचायला उशीर झाला अथवा पोहोचू शकलो नाही तर मनावर ताण यायचा. कारण 'नवाकाळ'ची बातम्या पाठवायची डेडलाईन दुपारी चार वाजाताची असायची. त्यामुळे मनाची घालमेल व्हायची. ती योगेशजी नेमकी हेरायचे आणि स्वतःची बातमी लिहायचे काम बाजूला सारून आधी मला पत्रकार परिषदेचे मुद्दे सांगायचे त्यावरून मग मी बातमी लिहून पाठवायचो. अनेकदा तर त्यांच्या लिहून झालेल्या कॉप्या माझ्या स्वाधिन करायचे, त्यावरून मला बातमी तयार कर म्हणून दिलासा द्यायचे. असे अनेकदा झाले आहे की एखादी घडामोड आपल्याला माहीत नसेल वा कळली नसली तरी काही वाटायचे नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे योगेशजी प्रेसरूमला आले की माझ्याजवळ येऊन सांगायचे अमुक एक राजकीय घडामोड झाली आहे. माझ्याकडे बातमी आहे तुला हवीय का? असे म्हणून आपल्या शबनम बागेतून कॉप्या काढून हातात द्यायचे. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' ही म्हण नेमकी कशी प्रचलित झाली हे माहीत नाही, मात्र योगेशजी यांच्या रुपातील हरीची मला वारंवार प्रचिती यायची हे मात्र नक्की. 

 खरे तर दुसऱ्याला मदत करणे हा योगेशजी यांचा स्थायीभाव होता. बातमीदारी करणाऱ्या अनेकांना अनेकदा ते अशी स्वतःहून मदत करायचे, मदतीला धावायचे हे विशेष! या त्यांच्या स्वाभाविक गुणांमुळेच मला शाळेत शिकविल्या गेलेल्या 'परोपकारी सदू'ची प्रकर्षाने आठवण यायची आणि तो सदू आपल्याला योगेशजी यांच्या रुपात भेटलाय, याचा आनंद व्हायचा. प्रसंगी एखादी एक्सकल्यूझिव्ह बतमीसुद्धा दुसऱ्याला देण्याची दानत योगेशजींकडे होती. त्यांचे प्रेम लाभलेल्या माझ्यासह अनेकांना हा सुखद अनुभव केंव्हा ना केंव्हा आलेला आहे. त्यांच्या या परोपकारी वृत्तीसोबतच त्यांच्यातील एका मार्गदर्शकाची अनुभूती मला अनेकदा आली. एखाद्या बातमीचा इन्ट्रो कसा करावा इतकेच नव्हे तर तुमच्या पेपरच्या पॉलिसीप्रमाणे बातमीला अँगल कसा द्यावा, याचाही अचूक कानमंत्र योगेशजी द्यायचे. त्यांच्या या गुणवैशिष्ट्याचा लाभ मला अनेकदा झालाय. किंबहुना मी त्याचा लाभार्थी ठरलो याचा मला आजही अभिमान आहे. एखाद्या बातमीचा विषय, त्याची परिणामकारकता याबाबत सांगण्याची त्यांची हातोटी ही एखाद्या मुरलेल्या शिक्षकासारखी होती. क्लिष्ट वा अवघड विषय देखील ते सहजतेने समजावून सांगायचे. कायम नेहरू सदरा आणि खांद्यावर शबनम बॅग या वेशातील योगेशजी पाहताना आणि मार्गदर्शन मिळवताना ते आपले गुरू आहेत, ही भावना माझ्या मनावर कोरली गेली आणि एका क्षणी मंत्रालय प्रेसरूममध्ये उत्स्फूर्तपणे मी त्यांना "गुरुजी" असे संबोधले, आणि त्यानंतर मी त्यांना कायम गुरुजी या नावानेच हाक मारू लागलो वा संबोधू लागलो. हे माझ्या इतके अंगवळणी पडले की बऱ्याचदा त्यांचे नाव योगेश वसंत त्रिवेदी आहे हेच मला पटकन आठवायचे नाही. माझ्यासाठी ते गुरुजी होतेच, पण माझ्याकडून त्यांना दिली गेलेली ही उपाधी त्यांना कायमची फिट्ट बसली! ते अख्या प्रेसरूमचे गुरुजी झाले. प्रेसरूमच्या बाहेर हे नाव पोहोचले.अगदी मंत्रालयाच्या आसपासच्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात 'गुरुजी' कधी ख्यातकीर्त झाले हे कुणालाच कळाले नाही. त्यांच्या गुरुजी या नामाभिमानाची कीर्ती इतकी सर्वदूर पसरली की राजकीय नेते, पदाधिकारीच नव्हे तर चक्क मंत्रीही त्यांना गुरुजी म्हणूनच संबोधू लागले. यात गुरुजींना योगेश त्रिवेदी म्हणणारे विरळाच किंबहुना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असतील अशी माझी धारणा आहे. इतका 'गुरुजी' नावाचा महिमा मोठा आहे.

चौकट–

परोपकारी ‘गुरुजी’

मी १९८४ मध्ये पूर्णवेळ पत्रकारितेत आलो. २५ डिसेंम्बर १९९० रोजी माझे लग्न झाले. तोपर्यंत मी वांद्रे(पूर्व) येथील शासकीय वसाहतीत रहात होतो. आमचे मोठे कुटुंब होते. एकत्र रहात होतो. मात्र लग्नानंतर स्वतःचे घर नसल्याने कुचंबणा होऊ लागली आणि १९९१ पासून मुंबईतील चारकोप (कांदिवली), लोअर परेल, खार (पूर्व) अशा वेगवेगळ्या भागात भाड्याने घर घेऊन राहावे लागले. १९९५ साली राज्यात युतीचे सरकार आले. या सरकारने मुख्यमंत्री कोट्यातून (५%) अनेक पत्रकारांना घरे वितरित केली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी चांगला परिचय होता. १९९० ला ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना माझ्या लग्नाला आले होते. पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून घरासंदर्भात बोलण्याइतपत त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. १४ मार्च १९९६ ला युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, त्यादिवशी मुखमंत्र्यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीला वर्षावर भेटीची वेळ दिली होती. त्यावेळी मी कार्यकारिणी सदस्य म्हणून उपस्थित होतो. कार्यकारिणीतील आम्ही तिघा-चौघांनी पत्रकार प्रवर्गातून ५% कोट्यातून सदनिका मिळावी म्हणून मुख्यमंत्री जोशी यांना विनंती अर्ज सादर केले. पुढे १९९८ पर्यंत आमच्या अर्जावर काहीच कारवाई झाली नव्हती. प्रत्यक्ष भेटीत अनेकदा मुख्यमंत्री महोदयांना घराची अडचण सांगितली. तेंव्हा दरवेळी ते माझ्या खांद्यावर हात ठेवून ‘तुम्हाला घर द्याची जबाबदारी माझी’, असे बोलायचे. पण घर काही मिळत नव्हते. दर तीन महिन्यांनी सदनिका वितरित झालेल्यांची यादी जाहीर व्हायची, पण माझे नाव त्यात नसायचे. या कालावधीत काही भुरट्या पत्रकारांनाही घरे मिळत होती, हे कळल्यावर मी व्यथित झालो. दरम्यान गुरुजींशी मी मनातली सल बोलून दाखवायचो. ते मला धीर द्यायचे. पण माझ्या भावना तीव्र होत्या. त्यामुळेंअखेर मी ठरवले की ‘हे सरकार सत्तेवर असेपर्यंत घर मागायचे नाही’, शिरस्त्याप्रमाणे माझा हा विचार मी गुरुजींकडे व्यक्त केला. त्यावेळी गुरुजींनी- असा आततायीपणा करू नका, थोडे थांबा सगळे नीट होईल. आपण प्रयत्न करू, असे सांगितले. जानेवारी आणि मार्च १९९८ अशा दोन याद्या जाहीर झाल्या. त्यातही माझे नाव नव्हते. अखेर आता आपल्याला घर मिळणार नाही, असे मी पत्नीलाही सांगितले. यानंतर मी घराचा विषय पुन्हा काढायचा नाही, असा निश्चय केला. एकदा मुख्यमंत्रयांची पत्रकार परिषद होती म्हणून आम्ही सगळे पत्रकार सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री समिती कक्षात गेलो. पत्रकार परिषद संपल्यावर मुख्यमंत्री आपल्या दालनात जायला निघाले असतानाच गुरुजींनी माझा हात धरून मला जवळपास खेचत नेले आणि त्यांच्या पुढ्यात उभे करून माझी ओळख करून देत मला अद्याप घर दिले गेले नसल्याचे व मी नाराज असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. गुरुजींच्या या सांगण्याचा मोठा परिणाम झाला. मुख्यमंत्रयांनी आम्हाला त्यांच्या सोब अँटी चेंबरमध्ये नेले आणि एका अधिकाऱ्याला सांगून सदनिका वितरणाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱयांना तातडीने बोलावून घेतले. मला आठवते देशपांडे नावाचे ते अधिकारी जेवण अर्ध्यावर सोडून तिसऱ्या मजल्यावरून आले होते. करण त्यांच्या हाताच्या बोटांना अन्नकण चिकटलेले स्पष्ट दिसत होते. ‘हे शिंदे माझे मित्र आहेत. यांना सदनिका दिलीच पाहिजे. आताच्या यादीत त्यांचे नाव आले पाहिजे’, असे मुख्यमंत्र्यांनी देशपांडे यांना बजावले. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी डायरीत माझे नाव लिहून घेतले. माझे व्हिजिटिंग कार्ड मागून घेतले आणि थोड्या वेळानंतर माझ्याकडे या, असे सांगून ते बाहेर पडले. जवळपास तीन वर्षे जे काम होत नव्हते ते गुरुजींच्या पुढाकारामुळे खरे तर कृपेमुळे झाले. मला घर मंजूर झाले. ऑगस्ट १९९८ मध्ये सदनिका खरेदिचा करार झाला आणि “ए-३०२, गोकुळ नगरी-दोन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१” हा माझ्या हक्काच्या निवासस्थानाचा पत्ता अस्तित्वात आला. मी आणि माझी पत्नी सौ. कुमुदिनी असे आम्ही उभयता मुंबईतील स्वतःच्या घराचे मालक झालो. आजपर्यंत आम्ही या घरात रहात आहोत. पण त्या दिवशी जर गुरुजींनी मला खेचत मुख्यमंत्री जोशी यांच्याकडे नेले नसते तर… हा विचार कधी मनात येतो तेंव्हा शाळेत शिकलेल्या ‘परोपकारी सदू’ या धड्याची हमखासआठवण येते आणि माझ्या जीवनात आलेल्या योगेश वसंत त्रिवेदी नावाच्या “परोपकारी गुरुजी” यांच्याबद्दलची माझ्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना आणखी घट्ट होते. ■ सदानंद शिंदे (ज्येष्ठ पत्रकार)

error: Content is protected !!