ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पाडव्याच्या तोंडावर सोने प्रचंड महागले

मुंबई: भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा पवित्र मुहूर्तांवर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५ हजार रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याच्या बेतात असलेल्या सामान्य नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. वायदे बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर ६९४८७ रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर जीएसटीसह ६८७०० रुपये इतका नोंदवण्यात आला. तर पुण्यात सोन्याच्या प्रतितोळा दराने जीएसटीची रक्कम पकडून 70843 रुपयांचा स्तर गाठला. यापूर्वी 26 मार्चला सोन्याचा प्रतितोळा दर ६६४२० रुपये इतका होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याची किंमत इतक्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. सोने खरेदीसाठी गुढीपाडवा हा शुभमुहूर्त समजला जातो. येत्या ९ एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यामुळे या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढणार, हे जवळपास निश्चित आहे. परंतु, सध्या ७० हजारांच्या आसपास असलेल्या सोन्याचा प्रतितोळा दर गुढीपाडव्यापर्यंत ७५ हजारांवर जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

error: Content is protected !!