ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

बदलापूर का अडकतोय पुराच्या विळख्यात .

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात आठवड्याभरापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून सावरत बदलापूर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सर्वसामान्य बदलापूरकरांना सहन करावा लागला आहे. नदी पात्राजवळच्या भागात, नाल्यांवर बांधकामे झाल्याने, नाले अरुंद झाल्यामुळे बदलापूरला पुराचा तडाखा बसत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे बदलापूरात नदीपात्राजवळच्या व शहरातील नाल्यांच्या जवळ झालेली बांधकामे नियमानुसार झाली आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बदलापुरात सन २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर तब्बल १४ वर्षांनी सन २०१९ मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता सन २०२१ मध्ये पुन्हा बदलापूरकरांना पुराचा तडाखा बसला आहे. या पुरात बदलापूर पश्चिमेकडील नदीजवळच्या भागातील अनेक इमारतींचे तळमजले पाण्यात गेले, चाळीमध्ये,बैठ्या घरांमध्ये पाणी गेले. नागरिकांच्या घरातील व दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले. अनेक हॉटेल व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले.अर्थात बदलापूरसाठी पूर नवीन नाही. सन २००५ पूर्वीही अतिवृष्टी झाल्यास वर्ष-दोन वर्षांच्या फरकाने बदलापुरात सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण होत होती. त्यावेळी बदलापुरात इमारतींची संख्या अत्यंत कमी असल्याने पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होत होता. मात्र गेल्या दीड -दोन दशकात बदलापुरात मोठ्या प्रमाणात इमारती, गृहसंकुले उभी राहिली आहेत. शहराचा हा विकास होत असताना पूर्वी निर्माण होत आलेल्या पूरपरिस्थितीतुन बोध घेऊन नदी पात्रालगतच्या भागातील इमारतींना परवानग्या देताना खाली स्टील्ट कम्पलसरी करण्याची गरज होती. या भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यादृष्टीने नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून ते बुजवले जाणार नाहीत वा छोटे केले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज होती. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने ठोस कार्यवाही केली आहे का? हे तपासण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरातील नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवले जाऊन पावसाळ्यात सखल भाग जलमय होऊन नागरिकांचे प्रचंड नुकसान होऊ नये यासाठी नाल्यांचे सर्वेक्षण करून त्या अहवालानुसार कृती आराखडा तयार करण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने पुररेषा अंतिम करून नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुळगाव बदलापूर नगर परिषद सभागृहात आयोजित बिल्डर्स असोसिएशनच्या बैठकीत नगरसेवकांनीही नैसर्गिक नाल्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले होते. नैसर्गिक नाले बुजवायला नको हे बिल्डरांना कळायला नको का? असा सवाल करीत याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली होती. तर नाल्यांचे सर्वेक्षण झाले नसल्याचा गैरफायदा बिल्डर्स व अधिकारी घेत असल्याचा आरोप करून नैसर्गिक नाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण झाले तरच हे शहर वाचेल,अशा भावना भाजपा शहराध्यक्ष संजय भोईर यांनी व्यक्त केल्या होत्या.यावर नगर परिषद प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. यापूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये शिरगाव भागातील नैसर्गिक नाले अडविणाऱ्या बांधकामांचा सर्व्हे करून त्यावर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले होते. त्याशिवाय विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच बदलापूरला बसत असलेला पुराचा फटका केवळ पावसामुळे बसला आहे की नियम धाब्यावर बसवून झालेल्या बांधकामांमुळे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
नदी,नाल्यालगतच्या बांधकामांच्या चौकशीची मागणी
बदलापुरात नदी, नाल्यालगत असलेल्या बांधकामांना देण्यात आलेली परवानगी तत्कालीन विकास नियंत्रण नियमावलीच्या नियमानुसार आहेत का? त्यांचे झालेले बांधकाम परवानगीनुसार झाले आहे का? सदर इमारतींच्या बांधकामांबाबत नगर परिषद प्रशासनाकडे काही तक्रारी आल्या होत्या का? असल्यास त्यावर नगर परिषद प्रशासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली. याबाबतची सविस्तर चौकशी केल्यास शहरात निर्माण होत असलेल्या पूरपरिस्थितीला अतिक्रमणे कारणीभूत आहेत की अतिवृष्टीच कारणीभूत आहे? हे स्पष्ट होईल,असे शहरातील सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने ११ जून २०२० रोजी उल्हासनदीची पूरनियंत्रण रेषा अंतिम करून त्याचे नकाशे जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. या पूरनियंत्रण रेषेच्या आत बांधकामे करण्यास परवानगी नसणार आहे.

error: Content is protected !!