शिदे सेनेला हवे मुंबईचे महापौरपद! ८० ते ८५ जागा महायुतीत निवडणुकीपूर्वीच तणाव
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने खिंडीत गाठले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८० ते ८५ जागा,महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी केली आहे.त्यामुळे मुंबईत भाजपची कोंडी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटी, चर्चा पाहता शिवसेना उबाठा आणि मनसे यांची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे भाजप नं सावध पवित्रा घेतला आहे. मुंबईत महायुती एकत्र लढेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत आहेत. ठाणे, पुणे, नवी मुंबईत भाजप स्वबळासाठी आग्रही आहे. पण मुंबईत महायुतीला शिंदेसेनेची सोबत हवी आहे. या परिस्थितीचा फायदा घेत शिंदेसेनेनं भाजपला जागावाटपासाठी प्रस्ताव दिले आहेत.२०१७ नंतर मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. त्यावेळी राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं. दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. एकसंध असलेल्या शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या. गेल्या ८ वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. २०१७ मध्ये विजयी झालेले निम्मे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद घटली आहे. पक्षात फूट पडल्यानं झालेलं नुकसान राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेत भरुन काढण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे.उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मुंबईत अद्यापही ताकद आहे. त्यात राज यांच्या मनसेसोबत त्यांची युती झाल्यास ठाकरे बंधू भाजप समोर आव्हान उभं करु शकतात. त्यामुळेच मुंबईत भाजपला शिंदेसेना सोबत हवी आहे. याची जाणीव असलेल्या शिंदेसेनेनं मुंबईत ८० ते ८५ जागा मागितल्या आहेत. तसा प्रस्ताव भाजपला देण्यात आला आला आहे. मागील निवडणुकीत एकसंध शिवसेनेनं जिंकलेल्या सगळ्या जागांसाठी शिंदेसेना आग्रही आहे.
विशेष म्हणजे शिंदेसेनेनं महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठीही भाजपला प्रस्ताव दिला आहे. भाजप महापौर पद स्वत:कडे ठेवणार असेल तर स्थायी समितीचं अध्यक्ष पद शिंदेसेनेला सोडण्यात यावं आणि भाजपला स्थायी समितीचं अध्यक्ष पद हवं असल्यास महापौर पद शिंदेसेनेसाठी सोडावं, असा प्रस्ताव आहे. गेल्या अडीच दशकांपासून मुंबईचं महापौर पद शिवसेनेनं आपल्याकडे राखलं आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह मिळवण्यात यशस्वी ठरलेले एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेत कशी रणनीती आखणार याकडे लक्ष लागलं आहे.

 
								 
															 
															 
															 
							 
							 
							