मत चोरीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा! मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या आदेश
मुंबई/आगामी पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखताना मतचोरीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
सावित्रीबाई फुले स्मारक येथे मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी नेते अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस हेमंत संभूस, रणजित शिरोळे, अजय शिंदे, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाळा शेडगे, गणेश सातपुते आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘आगामी महानगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतदारयादीवर बारकाईने लक्ष ठेवावे. त्यासाठी ४० माणसांमागे प्रत्येकी दोन मतदान केंद्र अधिकाऱ्यांची (बीएलओ) नेमणूक करावी. नेमलेला अधिकारी मतदारयादीतील पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय व्हॉट्स अॅप यादी तयार करावी. महापालिका निवडणूक चालू वर्षअखेरीस होणार असून, प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने आपापल्या प्रभागात लक्ष ठेवावे. राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत आवाज उठविला असून, मतदारयादीमध्ये जो घोळ झालेला आहे, त्या संदर्भात सर्वांनी लक्ष द्यावे.’असे आदेश दिले आहेत.’मतदारांची नावे यादीतून गायब होणे, मूळ प्रभाग सोडून दुसऱ्याच प्रभागात नाव असणे असे प्रकार महापालिका निवडणुकीत होऊ शकतात. याबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. ४० माणसांमागे प्रत्येकी दोन मतदान केंद्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या कामात कोणी कुचराई केली, तर त्या प्रभागात उमेदवार उभा केला जाणार नाही,’ असा इशारा ठाकरे यांनी दिला.दरम्यान, बैठकीपूर्वी ठाकरे यांनी महात्मा फुले वाड्यावर जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. या वेळी माळी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल आणि महात्मा फुलेंची मूर्ती भेट देऊन स्वागत करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असून, या कोंडीचा फटका राज ठाकरे यांच्या ताफ्याला बसला. शहराच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शनिवारी प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे पेठांमध्ये वाहने अडकून पडल्याचे प्रकार समोर आले. अशा गर्दीच्या ठिकाणी राज ठाकरे यांचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे राज यांच्या वाहनांचा ताफा गर्दीत अडकून पडला. एरवी पाच-दहा मिनिटांचे अंतर असलेल्या ठिकाणी राज ठाकरेंना पोहोचायला अर्धा तास लागला. मध्यवर्ती ठिकाणी गर्दी होत असताना अशा ठिकाणी त्यांचा दौरा आयोजित केल्याने ठाकरे यांनी संतप्त होत पदाधिकाऱ्यांना सुनावले.
