ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा – विधानसभेची तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई: चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज करणार नाही असं सांगणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळीही लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत. शिवाजी पार्कवर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला, त्यावेळी राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली.
राज ठाकरे हे भाजप-सेना-राष्ट्रवादीच्या महायुतीत येणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यासंबंधित राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेटही झाली होती. त्यानंतर राज ठाकरेंना महायुतीकडून दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ सोडण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरेंचा पक्ष यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चाही सुरू झाली.
पण राज ठाकरे यांनी यावर आता जाहीररित्या पडदा टाकला. आपण यावेळी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी सुरू करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. आपल्याला कोणतीही राज्यसभा वा विधानपरिषदही नको असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी २००९ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा एकही खासदार निवडून आला नसला तरी अनेक मतदारसंघात त्यांनी लाखांच्यावर मतदान घेतलं होतं. त्यानंतर झालेल्या २०१४ सालच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत लोकसभा निवडणूक लढवली नाही.
नंतर झालेल्या २०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना विरोध केला खरा, पण त्यावेळीही त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. राज ठाकरेनी त्यावेळी राज्यात अनेक सभा घेतल्या, पण निवडणुका लढवल्या नाहीत.
आता मनसेची महायुतीमध्ये सहभाग होण्याची चर्चा सुरू असतानाही राज ठाकरेंचा पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. जागावाटपावर चर्चा झाली त्यावेळी आपण त्यामध्ये रस दाखवला नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच माझ्या पक्षाला कोणतीही राज्यसभेची जागा नको, कोणतीही विधानपरिषदेची जागा नको असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

error: Content is protected !!