ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कॉंग्रेस कडून लूट जिंदगीके साथ भी जिंदगी के बाद भी – मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

सुरगुजा (छत्तीसगड) – ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसाहक्क कराबाबत केलेल्या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथे आयोजित सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसची लूट ही ‘जिंदगी के साथ भी’ आणि ‘जिंदगी के बाद भी’ सुरूच राहणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसचे घातक इरादे आता समोर येऊ लागले आहेत. आता ते वारसाहक्क कर लागू करण्याची भाषा बोलू लागले आहेत. ज्यांनी कधीकाळी शहजादे यांच्या वडिलांना सल्ला देण्याचे काम केले तेच आता शहजादेंना सल्ला देत आहेत. मध्यम वर्गावर दुहेरी कर लावण्याची भाषा ते बोलत आहेत. काँग्रेसचा पंजा आता तुमच्या मुलांच्या ताब्यातील संपत्ती हिरावून घेईल. जी संपत्ती माता-पिता संकलित करतात ती आता त्यांच्या मुलाबाळांना मिळणार नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये सर्वाधिक कर आकारण्यात येईल. जेव्हा तुमचे निधन होईल तेव्हा तुमच्या अपत्यावर वारसाहक्क कराचे ओझे लादले जाईल.’
पित्रोदा यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिकेतील वारसाहक्क कराचा उल्लेख केला होता. अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीकडे दहा कोटी डॉलर एवढी मालमत्ता असेल आणि ती व्यक्ती मरण पावल्यानंतर वारसाहक्काने तिच्या अपत्यांकडे केवळ ४५ टक्के एवढीच मालमत्ता जाते उर्वरित ५५ टक्के मालमत्ता सरकार दरबारी जमा होते. भारतामध्ये दहा अब्ज डॉलर एवढी संपत्ती असलेली व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्या अपत्यांना तेवढीच मालमत्ता मिळते सामान्यांना मात्र काही मिळत नाही असे पित्रोदा यांनी म्हटले होते.
‘‘भारतात वारसाहक्क करासारखे काहीही नाही यावर चर्चा झाली पाहिजे कारण संपत्तीचे फेरवाटप करायचे झाले तर लोकहितासाठी नवीन कायदे करावे लागतील,’’ असे मत पित्रोदा यांनी मांडल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे तर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याची सारवासारव पित्रोदा यांनी केली आहे. ‘‘ तुम्ही तुमच्या कारकिर्दीत संपत्ती निर्माण केली आणि आता ती तुम्ही वारसा हक्काने पुढील पिढीला देणार आहात. मात्र यातील काही भाग लोकहितासाठी दिला पाहिजे असा कायदा अमेरिकेत आहे. हा कायदा आपणास योग्य वाटतो मात्र भारतात तसे काही होत नाही,’’ असे विधान पित्रोदा यांनी केले होते.

error: Content is protected !!