ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मला धन्यवाद नकोय तुमचा आशीर्वाद हवाय – उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई- मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू. मला धन्यवाद नको तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळाचौकी येथे आयोजित केलेल्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमात मुंबईकरांना केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते.

शहिद भगतसिंग मैदानावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर व भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमाला मला बोलावले तेव्हा मी म्हटले मी सत्कार घेत नाही. त्यांनी मला आग्रह केला ज्यांच्या करता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. २०१९ साली प्रविण दरेकर यांच्यासोबत बैठका घेतल्या. मुंबईतील माणूस आपले स्वतःचे घर का घेऊ शकत नाही. त्यावर शासन निर्णय केला. दुर्दैवाने २०१९ साली आपले सरकार गेले. ज्यांनी आपण मराठी माणसासाठी आहोत अशा वलग्ना केल्या. त्यांनी २०१९ चा शासन निर्णय गुंडाळून ठेवला बिल्डरधार्जिन्या लोकांसाठी. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपले सरकार आले. प्रविण दरेकर यांनी गृहनिर्माण सहकार परिषद घेतली. ती परिषद झाली त्यावेळी मला समारोपाला बोलावले. माझ्यासमोर १६ मागण्या ठेवण्यात आल्या. त्या १६ ही मागण्या आपण पूर्ण केल्या त्याचा शासन निर्णयही काढला. मात्र १६ मागण्यानी संपूर्ण गृहनिर्माणचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. काल प्रविण दरेकर यांनी माझी भेट घेऊन ३५ मागण्यांचे निवेदन दिले. या ३५ मागण्या आहेत त्यातील ८ मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत. पण या ३५ मागण्यांवर १५ दिवसात बैठक घेऊन त्या कशा पूर्ण करता येतील त्यावर चर्चा करू. या कार्यक्रमासाठी ८ हजार संस्थांनी, २५ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले. जी निवेदने आली आहेत त्यावर आम्ही सर्वजण काम करू.

अभ्यूदय नगरचा सीएनडीचा विकास महत्वाचा आहे. इथे येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला परवानगी दिली तुम्ही माझ्यावतीने घोषणा करा. त्याप्रमाणे अभ्यूदय नगरच्या सीएनडीच्या विकासाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ असेही फडणवीस म्हणाले. तसेच पोलीस वसाहतींचा प्रश्नही लवकरच सोडवू. आम्हाला एफएसआयची चिंता नव्हती. आम्हाला त्या भिंतीत राहणाऱ्या मराठी माणसाची चिंता होती. १०० फुटात राहणाऱ्या व्यक्तीला ५०० चौफु. घर देतोय. गिरणी कामगारांचा विषय सुनील राणे यांनी चांगला लावून धरला आहे. गोरेगाव पत्राचाळीतील लोकांचा प्रश्नही मार्गी लावलात. काही लोकांनी त्यांना गंडवले, मोर्च्यात नेले. पण त्यांचे काम केले नाही. आपण त्यांचा विषय मार्गी लावलात. हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम नाही. हा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काय करता येईल यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना आमदार दरेकर म्हणाले की, मुंबईतील हौसिंगमधील प्रश्नांची वचनपूर्ती करण्यासंदर्भात आणि ज्या समस्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. गोरेगाव नेस्कोत परिषद घेतली. तिथे २२ मागण्या केल्या. त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या. २२ पैकी १६ शासन निर्णय मान्य करण्याचे काम देवेंद्र फडणवीस तुम्ही केलात. अनेक विषय आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचे पाय येथे लागल्यामुळे इकडे काहींची हलचल वाढली आहे. गिरणगाव हा कुणाचा तरी बालेकिल्ला होता. येणाऱ्या काळात हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच विकास काय असतो हे तुम्ही पाच वर्षाच्या काळात दाखवून दिलात. अडीच वर्षात विकास ढेपाळला होता. पुन्हा तुम्ही सरकार आणून विकासाला गती दिलात. येथे आलेले लाभार्थी आहेत. ही गर्दी तुमच्या प्रामाणिकपणाची, विश्वासाची आहे. तुम्हीच न्याय द्याल अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यांना विश्वास द्या, अशी विनंती दरेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

तसेच आशिष शेलार म्हणाले की, शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पाहिले तर लक्षात येते मैदानात घुसायला मुंगीलाही वाव नाही. ३० हजार सोसायट्यापर्यंत संपर्क करून ठराव घेऊन आलेली ही लोकं आहेत. मुंबईच्या इतिहासात खऱ्या अर्थाने गिरणगावात समस्त मुंबईकरांचा विषय घेऊन अभूतपूर्व मेळावा कधी झाला नसेल तो आज होतोय, त्याचे चित्र येथे दिसते. विनम्रतेचे दुसरे रूप देवेंद्र फडणवीस आहेत. २०१४ पासून फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतले. मी गिरणगांवात जन्मलो आहे. चाळ पडली म्हणून संक्रमण शिबिरात राहिलो. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची अडचण आम्हाला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना ९ मेट्रो भेट दिल्या आहेत. मुंबईकराला पक्क घर जे मिळतेय ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या चाळीची व्याख्या बदलली. हेरिटेज टीडीआर मुंबईत कधीच नव्हता. तो आणण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. गेल्या दीड वर्षात ८५ हजार गिरणी कामगारांच्या घरांची पात्रता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिली. दरम्यान यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, माजी आमदार विनय कोरे, शिवसेना नेते मिलिंद देवरा, आ. मनिषा कायंदे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, आ. कालिदास कोळंबकर, आ. तमील सेल्वन, आ. यामिनी यशवंत जाधव, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार प्रसाद लाड, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे उपाध्यक्ष विलास सावंत, अभ्यूदय नगर सह. गृह. संस्थेचे सचिव तुकाराम रासम, मुंबई भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनील बांबूळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!