ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न

: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त ठरणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या निवडणुकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता अन्य चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला नेत्रदीपक यश मिळाले आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये दणदणीत यश मिळविताना भाजपने देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचा सपाटून पराभव केला. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या आणि देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण 403 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता तर होतीच, पण या राज्यातील जनता कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा निवडून देत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यावरून यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे व त्यांचा पक्ष भाजप असे दोन्ही पुन्हा राज्यात सत्तेवर येणे कठीण आहे, असे भाकीत वर्तविले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि राज्यातील योगी सरकारने गेली पाच वर्षे केलेली लोकाभिमुख कामे आणि केंद्रातील योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यात मिळविलेले यश या जोरावर योगी आणि भाजपने पुन्हा या राज्यातील सत्ता हस्तगत केली आणि एक नवा इतिहास रचला. हे यश सतके निर्भेळ म्हटले पाहिजे की, भाजपने एकूण 403 जागांपैकी 274 जागा जिंकल्या आणि विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले. म्हणूनच या यशाने आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दुसरे – तिसरे कोणी नाही, तर नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपच पुन्हा एकदा बाजी मारणार यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. कारण केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. ‘मोदी है तो मुमकिन है’ हे यापूर्वी अनेकदा दिसून आले असून सगळ्यांनाच आता ते पटूही लागले आहे आणि या निवडणुकांमध्ये ते अनुभवायला मिळाले. देशावर कोरोनाचे महाभीषण संकट कोसळले तेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळली ती गोष्ट लाजबाबच म्हणायला हवी. केंद्रीय आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि तेथील यंत्रणा यांच्याशी वारंवार संपर्क साधून त्यांच्याशी चर्चाविनिमय करून, प्रसंगी मार्गदर्शन करून संपूर्ण परिस्थिती योग्य तर्‍हेने हाताळली गेली. तसेच देशभरात यशस्वीपणे राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम यालाही तोड नाही. कोरोना संकटाबरोबरच आलेल्या इतर अन्य संकटांवरही मोदी सरकारने सहज मात केली आणि देशातील विकासाची गंगा थांबू दिली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानसारख्या देशातून सतत होणार्‍या देशविघातक कारवाया यांनाही आता चांगलाच चाप बसलेला दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या आपल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी हाती घेतलेली ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम. या सगळ्यांचा परिपाक म्हणून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश प्राप्त केले असेच म्हणावे लागेल. म्हणूनच उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून गोव्यामध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. या चारही राज्यांमध्ये सलग दुसर्‍यांदा भाजप सत्ता स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करण्यात येणार्‍या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणार्‍यांवर जोरदार टीका केली. काही लोक भ्रष्टाचार करणार्‍यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थांना बदनाम करत आहेत. आपल्या देशात भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्ध लोकांमध्ये राग आहे हे खरे आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोर्‍या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे आणि भाजपने 2014 मध्ये प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती. तोच प्रामाणिकपणा पाहून जनतेने 2019 मध्ये पुन्हा भाजपला निवडून दिले. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ करण्याचे आश्वासन जनतेला दिल्यानंतर त्याच दिशेने मार्गक्रमण सुरू असताना सरकारला आणि सरकारी तपास यंत्रणांना बदनाम करणार्‍याचा प्रयत्न करणार्‍यांचाही मोदींनी खरपूस समाचार घेतला. उत्तर प्रदेशात 37 वर्षांनंतर लागोपाठ दुसर्‍यांदा सत्तेत येण्याचा विक्रम भाजपने केला. भाजपने मोदी आणि योगी यांच्यावरच प्रचारात सारे लक्ष केंद्रित केले होते. लागोपाठ दुसर्‍यांदा सत्ता मिळाल्याने योगी हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काही वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची स्वप्ने बघणार्‍या मायावती यांच्या बसपाचा उत्तर प्रदेशात पार धुव्वा उडाला.ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.शेतकरी आंदोलन, कोरोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला़ असून त्यातच आगामी 2024 च्या निवडणुकांची नांदी स्पष्ट दिसत आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच ; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केल़े पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसपच्या अस्तित्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केल़े विशेष म्हणजे मोदींचा करिष्मा आणि भाजपच्या लाटेत काँग्रेस, ममता बॅनर्जी, मायावती, एमआयएमचे ओवेसी आदींची धूळधाण उडालेली दिसली.

error: Content is protected !!