धक्कादायक!मंचर मध्ये मशिदीत भुयार सापडले
पुणे/मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत, ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आता या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पहाणी करण्यात येणार आहे, इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की, आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीनं आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. घटनास्थळाची पहाणी करण्यात आली असून, काल रात्री देखील आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मंचर शहरातील सर्व धर्मीय लोकांनी आमच्या आवाहानाला प्रतिसाद देत शहरात शांतता ठेवली आहे. एसआरपीफच्या दोन तुकड्या तिथे तैनात करण्यात आल्या आहेत.