गुजरातचा जयजयकार करणाऱ्या शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
।
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला मी आठवण करुन देतो. यापूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब ‘जय महाराष्ट्र, जय कर्नाटक’ म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे, असं समजायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो. त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटलं. याचा अर्थ एकनाथ शिंदेंचं गुजरातवर जास्त प्रेम आहे आणि मराठीवर कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. भारताला देखील स्वतंत्र केलं आहे. मुघल सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा रोवण्याचं काम मराठी माणसाने केलं आहे. एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर चुकीचं आहे.
