ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान     

                    मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला.  ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक रंगभूमी दिवसानिमित्त बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात एका शानदार सोहोळ्यात प्रख्यात रंगकर्मी बाबा पार्सेकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार विजय कदम यांना प्रदान करण्यात आला. दादा कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे प्रचंड प्रमाणात गाजलेले नाटक बंद पडत असतांना विजय कदम यांनी हे नाटक पुनश्च हरी ओम म्हणून सुरु केले. त्यामुळे विजय कदम यांना दादा कोंडके यांच्या नांवाचा हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक कुलकर्णी यांनी स्वतः पुरस्काराची रक्कम देणगीदाखल दिली.

‘अवतरण अकादमी’ 23 वर्षे जागतिक रंगभूमी दिवस साजरा करीत आहे. ह्या वर्षी ‘अवतरण’चा सोहळा प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह बोरिवली येधे संपन्न झाला. 

दर वर्षी ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट’ने प्रसारित केलेल्या आंतरराष्ट्रीय संदेशाचे वाचन, एकपात्री – द्विपात्री अभिनय स्पर्धा, एकांकिका लेखन स्पर्धा, (गेल्या दोन वर्षात ‘कोव्हिड १९’ मुळे फक्त एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.) अशा उपक्रमांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण, अकादमीच्या नाट्यविद्यार्थ्यांची नवीन एकांकिका आणि ‘’अवतरण सन्मान’’ प्रदान, असा कार्यक्रम असतो.

ह्या वर्षी ज्येष्ठ नेपथ्यकार मान. बाबा पार्सेकर ह्यानी समारंभाध्यक्षपद भूषविले, तर विशेष पाहुणे ह्या नात्याने मान. अशोक कुळकर्णी उपस्थित होते. 

‘अवतरण अकादमी’चे अध्यक्ष संभाजी सावंत ह्यानी ह्या मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुस्तकभेट व मानचिन्ह देऊन स्वागत केले आणि ‘जागतिक रंगभूमी दिवसा’चे महत्त्व विशद केले. 

नाट्य परिषद बोरिवली शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते  प्रदीप कबरे ह्यानी अमेरिकन दिग्दर्शक  पीटर सेलर्स ह्यांच्या संदेशाचे वाचन केले. 

दिग्दर्शक व प्रकाशयोजनाकार उन्मेष विरकर, ज्येष्ठ रंगभूषाकार शरद विचारे, वेशभूषाकार शरयु कदम ह्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

अकादमीच्या एकांकिका लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रथम पारितोषिक रु. तीन हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र अंकुर ढमाले, द्वितीय क्रमांक रु. अडीच हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र कौशिक साऊळ, तृतीय क्रमांक रु. दोन हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र संकेत झगडे व उत्तेजनार्थ पारितोषिके रु. एक हजार व प्रशस्तिपत्र, अभय कुलकर्णी व नीरज सबनीस ह्याना मिळाली.

गेली चार वर्षे ‘अवतरण नाट्यव्रती सन्मान’ हे, व्यवसायाव्यतिरिक्त नाट्यकलेच्या माध्यमातून युवकांना आणि वंचितांना व्यक्त होण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी व्रतस्थपणे कार्य करणार्या महाराष्ट्रातील व्यक्तीला दिले जाते. ह्या वर्षी सौ. भारती सावंत पुरस्कृत सदर पारितोषिक, रुपये अकरा हजार, मानपत्र, पुस्तकभेट, शाल आणि श्रीफळ ह्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील मान. हरीष इथापे ह्याना प्रदान करण्यात आले. 

ह्या वर्षापासून, लोकरंगभूमी ते नागर रंगभूमी असा यशस्वी प्रवास करून चित्रपटातून जनमानसात पोचलेला नामवंत खेळीया कै. दादा कोंडके ह्यांच्या स्मृत्यर्थ, लोककलांना नागरी जनमानसात प्रतिष्ठित करणार्या नाट्य-अभिनेत्याला, दादांचे मित्र अशोक कुळकर्णी पुरस्कृत रुपये अकरा हजार, मानपत्र, पुस्तकभेट, शाल आणि श्रीफळ असे ‘कै. दादा कोंडके अवतरण सन्मान’ हे पारितोषिक दिले जाते आहे. ह्या प्रथम वर्षी ज्येष्ठ अभिनेता विजय कदम ह्यांना सदर पारितोषिकाने गौरविण्यात आले. 

दोन्ही सन्मानमूर्तींच्या मानपत्रांचे वाचन  ज्येष्ठ रंगकर्मी सुहास कामत ह्यानी केले. 

अकादमीचे विश्वस्त कोषाध्यक्ष हेमंत बिडवे ह्यानी आभार प्रदर्शन केले.

उत्तरार्धात ‘अवतरण अकादमी’च्या एकांकिका लेखन स्पर्धेतील ‘मुक्ती’ ही ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथेवर आधारित, अभय कुलकर्णी लिखित व ‘अवतरण’ची नाट्य विद्यार्थी जान्हवी दरेकर दिग्दर्शित एकांकिका सादर झाली. प्रीतम भोईर, उमेश गमरे, सायली पालांडे, स्नेहल बेटकर, महेश कांबळे, प्रतीक बोरसे व शंतनु पेडणेकर ह्यानी ‘मुक्ती’ ही आगळी एकांकिका प्रभावीरित्या सादर केली. सर्व कलाकारांचे विजय कदम व  हरीष इथापे ह्यांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह ‘अवतरण अकादमी’चे विश्वस्त विजय लाड, सौ. विनया लाड, सौ. भारती सावंत, मनोहर सरवणकर, विजय सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!