मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत केवळ एका दिवसाची सशर्त परवानगी
मुंबई/ मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. २९ तारखेला केवळ एकच दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांना आझाद मैदानापर्यंत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्याने मैदानाच्या क्षमतेनुसार केवळ ५००० आंदोलकांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.
आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पूर्व परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही. आझाद मैदानात अन्न शिजवण्यास पोलिसांनी मनाई केली असून आझाद मैदानाची स्वच्छता देखील आंदोलनकर्त्यांची जबाबदारी असल्याच मुंबई पोलिसांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आंदोलनात लहान मुलं, गरोदर स्त्रिया तसेच वृद्धांना सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत प्रशासनाने घातलेल्या अटी शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे.मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाची प्रत तसेच नियमावलीची प्रत देखिल सोबत जोडली आहे. अटी शर्तींचे उल्लंघन करत कायद्याचा भंग केल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाईचा इशारा देखील मुंबई पोलिसांनी दिला आहे
