भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा- परिवहनमंत्री सरनाईक
मुंबई/ ५१५० भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले . ते आज महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, २२ मे पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसण्याची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनी सोबत केलेला निविदा करार रद्द करावा.
शिवशाही बसेस चे रुपांतर हिरकणी मध्ये
सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या टप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम)बसेस मध्ये करण्यात यावे . तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात असे निर्देश सरनाईक यांनी दिले
