पालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वाट्याला अवघ्या ६५ जागा? कार्यकर्ते नाराज
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कब्जा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत १५० पारचा नारा भाजपाने दिला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपासह घटक पक्ष करत आहेत. त्यामुळे महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ६५ ते ७० जागा येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हजारो कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यात मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. ठाकरे बंधूंची युती झाल्यास मोठ्या प्रमाणात मराठी मते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाने मुंबईत आतापासून तयारी सुरू केली आहे. मुंबईत १५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे टार्गेट भाजपाने ठेवले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यानंतर आता मुंबईत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सज्ज आहे. त्यासाठी १५० जागांवर उमेदवार उतरवण्याची योजना भाजपाने आखली आहे. त्यामुळे जर महायुती झाली तर शिंदेसेनेला ६५ ते ७० जागा सोडण्याची भाजपा तयार असल्याचं बोलले जाते.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. राज आणि उद्धव यांच्या भेटीगाठी वाढल्याने शिवसेना-मनसे येत्या निवडणुकीत युतीने लढतील अशी चर्चा सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधू यांची ताकद आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुंबईत भाजपाला धक्का दिला होता. उत्तर मुंबई वगळता इतर ठिकाणी भाजपा उमेदवार पराभूत झाले. शिंदेसेनेचे एकमेव खासदार अत्यंत कमी मताधिक्यांनी निवडून आले होते.
