राज्य वस्तू संग्रहालयाबाबत तरुणांच्या संकल्पना मागवा ! -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची सूचना
मुंबई, : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभे राहणारे राज्य वस्तू संग्रहालय कसे असावे, याबाबत राज्यातील तरुणांच्या नवनवीन संकल्पना समजून घेणे आवश्यक असून त्यासाठी स्पर्धा आयोजन करावे, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केली.
जागतिक वारसा व संग्रहालय दिनानिमित पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री, ॲड.शेलार यांनी गेटवे ऑफ इंडिया या स्मारकांवर होणाऱ्या कार्यक्रमाचे बुकिंग करण्यासाठी तयार केलेल्या पोर्टलचे लोकार्पण केले. या निमित्ताने केलेल्या अध्यक्षीय भाषणात शासनाने जागतिक वारसा नामांकनासाठी केलेले प्रयत्न व भविष्यातील वाटचाल याची रूपरेखा मांडली.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मराठा लष्करी भूप्रदेशाबरोबर कोकणातील कातळशिल्प हा जागतिक वारसा या दृष्टीने महत्वाचा विषय असून तो जगासमोर मांडताना संशोधनात्मक पद्धतीने मांडला जावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विरासत से विकास तक’ या दूरदृष्टीची टप्याटप्प्याने अंमलबजावणी अपेक्षित आहे. भारतातील संग्रहालय चळवळ ही ब्रिटिश राज्यात उदयाला आली असल्याने त्यात वसाहतवादी दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो, असेही ते म्हणाले. भविष्यातील संग्रहालये ही भारतीय दृष्टिकोनातून तयार व्हावीत, ही अपेक्षा मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
यानिमित्ताने विवेक वाघ कृत कातळशिल्पांवरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. याबरोबरच कातळशिल्प या विषयावर वृषाली लेले, अबोली थत्ते व राहुल नरवणे यांनी नृत्यनाटिका सादर केली. या बरोबर डॉ.सूरज पंडित, डॉ.निलंबरी जगताप व वास्तुविशारद मृदुला माने यांची कान्हेरी लेणी: भविष्यातील जागतिक वारसा, महाराष्ट्रातील संग्रहालय चळवळीचा इतिहास व डिजिटल डॉक्युमेंटेशन अनुक्रमे या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे व पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर उपस्थित होते.
