दिल्लीतील स्वामी चैत्यनंदचे सेक्स स्कँडल! आश्रमातील १७ विद्यार्थिनीं कडून पोलखोल
नवी दिल्ली/स्वामी चैतन्यनंद सरस्वती पार्थ सारथी यांच्यावर श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थिनींसाठी अपशब्द वापरले आणि त्यांना व्हॉट्सअॅप, एसएमएसद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएमच्या विद्यार्थिनींनी केलेल्या लैंगिक छळ आणि फसवणुकीच्या आरोपांची आता दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. श्री श्रृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तेचे प्रशासक पी. ए. मुरली यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी ही तक्रार दाखल केली होती.
४ऑगस्ट रोजी पी. ए. मुरली यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी असंही म्हटलंय की संस्थेतील काही प्राध्यापिका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव आणला होता. विद्यार्थिनींचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी एकूण ३२विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी १७ जणींनी आरोपीवर अपशब्द वापरल्याचा, अश्लील मेसेज पाठवल्याचा आणि शारीरिक संपर्क करण्याचा आरोप केला. इतकंच नव्हे तर या गोष्टींना विरोध केला असला काही प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्यावर दबाव टाकला, असंही त्या म्हणाल्या.विद्यार्थिनींना धमकावण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी आरोपीने बराच काळ आपल्या प्रभावाचा वापर केला होता, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे हे प्रकरण फक्त एकाच घटनेपुरतं मर्यादित नसून बऱ्याच काळापासून हे सर्व सुरू असल्याचं दिसून आलं. याप्रकरणी वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आणि आरोपीच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संस्थेतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, आरोपी स्वामी चैतन्यनंद सरस्वती पार्थ सारथी फरार आहे.
