[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईकरांची‘मोनो’ कधी सुरक्षित धावणार?

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि त्याहीपुढे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कर्जत, कसारा ते अगदी पनवेलपर्यंत विस्तारत जाणारी महामुंबई पाहून आपला प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. अटल सेतू, फ्रीवेचे जाळे, सी लिंक, मुंबई, ठाणे भुर्रकन गाठायचं असल्यास सुसाट प्रवासाची अनुभूती देणारे उड्डाणपूल सर्व कसं अगदी विकासाच्या नावानं भरून पावल्यासारखं वाटतं. पण, धकाधकीच्या जीवनात जराही न अडखळता दररोज लोकल ट्रेन, रस्ते, महामार्गावरून वार्‍याच्या वेगाने नोकरी, व्यवसायानिमित्त पायाला भिंगरी बांधून धावणारा मुंबईकर दरसाल पावसाळ्यात एखाद, दुसरा दिवस खेळण्यातून सेल काढून घेतल्याप्रमाणं बंद पडतो, एका जागी थांबतो, त्याला सक्तीचा ब्रेक घेणं भागही पडतं. १८, १९ ऑगस्ट २०२५च्या पावसातही मुंबईकराचं तेच झालं. डोळ्याचं पातही लवू न देता ढगफुटीसारखा बरसलेल्या पावसाने मुंबईकरांना घरीचं बसवलं. मुंबई, ठाणे आणि महामुंबईवाल्यांचे सेकंद, मिनिटांवर चालणारे लोकल इंडिकेटर एकाएकी शून्यावर आणून वांदे केले. नोकरी किंवा इच्छित ठिकाणी जायचं असेल तर नाखवा बोटीनं फिरवालं का, एवढाच पर्याय जलकोंडीत अडकलेल्या मुंबईकरांपुढे उरल्याचे मीम्सही आजपर्यंत वार्‍याच्या वेगाने इकडून तिकडं फिरत आहेत. पण, आणखी किती लोकसंख्येला पोटात घेणारा इतक्या विस्फोटक परिस्थितीपर्यंत येवून ठेपलेली आपली बेटावरची मुंबई आता सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. आपल्या पोटात अन्न आणि पाण्याचं प्रमाण एकाएकी वाढलं की काय परिस्थिती होते तीच गत सर्वांना मायेच्या पंखाखाली घेणार्‍या मुंबईची का बरं नाही होणार? सालाबादप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही आपल्यातील काही बेशिस्त मुंबई, ठाणेकरांनी गटार, नाले, रस्त्यांवर कुठेही सार्वजनिक ठिकाणी फेकलेला प्लास्टिक व इतर कचरा सव्याज आपल्या घरवस्तीपर्यंत पोहोचलेला दिसलाच.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह सर्वच ठिकाणी पाऊ स धो-धो कोसळत असताना अंतर्गत वाहतुकीचे जाळे असलेल्या मोनो, मेट्रोवर प्रवासाची भिस्त नेहमीप्रमाणे होती. परंतु, लग्न होवून अनेक वर्षे लोटल्यानंतरही नववधूप्रमाणे बावरणं, अडखळणं मोनोरेलला सोडणं काही जमलेलं नाही.
४ फेब्रुवारी २०१४ पासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये आलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिली मोनो धावली ती चेंबूर ते वडाळा मार्गावर. आजघडीला तिचा विस्तार चेंबूर ते संतगाडगे महाराज चौक असा झाला आहे. या मार्गावर अनेक अशी स्थानके येतात जी रेल्वेस्थानके जवळ असल्याने प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर जात आहे.
त्यामुळे कायम तोट्याच्या गणितात असलेली मोनोरेल कुठेतरी स्थिरस्थावर होत असताना दिसत होती. पण, १९ ऑगस्टच्या तुफान पावसाताच माशी शिंकली आणि मोनोरेलच्या सुरक्षेविषयी प्रवाशांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रवाशांच्या अतिभारामुळे चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेल लटकली. ती एका बाजूला कलली. यातील शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आला. गाडीतील एसी आणि लाइट बंद पडल्याने अनेक प्रवासी गुदरमरले, बेशुद्धही पडले. त्याचवेळी मुंबईत पावसाचा जोर असल्याने महापालिका आणि अग्निशमन दलाच्या मदतकार्यालयाही उशीर झाला. अनेक प्रवाशांनी तर मोनोरेलचा प्रवास यापुढे नको रे बाबा, अशा प्रतिक्रिया नोंदवत मोनोविषयी मनात असुरक्षेला आणखी जागा निर्माण केली. आधीच तोट्यात, घाट्यात गेलेली मोनो आता पुढील काळात यातून सावरेल का, एमएमआरडीए प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी कशी देईल, यावरच ही गाडी रूळावर येणार की घसणार हे ठरणार आहे.
२०१४ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलकडे सुरुवातीपासून प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. मुंबईच्या विविध परिसराला जोडणारी आणि लोकलसेवेवरील ताण कमी करणारी मोनोरेल प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, असे घडूच नये याची प्रशासनाने अगदी सुरुवातीपासूनच काळजी घेतली, हा सात्वीक संताप प्रवाशांनी व्यक्त केल्यास तो गैर ठरू नये.
सध्यस्थितीत चेंबूर ते संतगाडगे महाराज महाराज मार्गावर धावणार्‍या मोेनोरेलचं वेळापत्रक कोलमडलेलचं आहे. अर्धा तासांनी येणारी मोनोरेलही लोकलगर्दी टाळण्यासाठी प्रवाशांना हवी आहे. मुंबईतील गगनचुंबी इमारती, खाडी किनारा, डोंगराळ भाग आणि कायमच वाहतूककोंडीने चक्का जाम असलेल्या भागांतून मुंबईकरांना अलगद सोडणारी मोनोरेल प्रवाशांना का बरं नकोशी वाटेल? परंतु, चेंबूर ते संत गाडगे महाराज मार्गावर प्रवास करताना दादर, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, परळ, वडाळा परिसरात नोकरदार, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद देणारी मोनो कधी उभारीच घेवू शकली नाही. सुरुवातीपासून आतापर्यंत लाइनवर नसलेलं गाड्याचं वेळापत्रक, अनेक छोट्या-मोठ्या अपघातानंतरही प्रवाशांचा विश्वास जिंकू न शकलेली मोनो खेळण्यातल्या ट्रेनसारखी कधी बंद तर कधी चालू अशा स्थितीतच राहिली. माथेरानच्या मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रवाशांची एकाएकी गर्दी सिझनमध्ये उसळते तशीच गर्दी अप्रूप म्हणून मोनो प्रवासासाठी सणासुदीला, रविवारी सुट्टीच्या दिवशी होत असते.
मात्र अपघातांचे विघ्न, आपतकालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षेची हमी, नोकरदारांसह इतर प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी नवनवीन योजना यासाठी कधी आश्वासक पावले उचलली गेली का? हा प्रश्न मोनोला उभारी देण्यात कायमच उपस्थित होत राहिला. प्रवाशांना सुरक्षेची आणि चांगल्या प्रवासाची हमी देण्यात मेट्रो रेल्वे प्रशासनाने आघाडी घेतली असताना मोनोरेलविषयी प्रशासनाला कोणतीही आत्मीयता अथवा जिव्हाळा नाही का, असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मुंबईकरांना का बरं न पडावे?
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ढकलगाडीप्रमाणे चालणारी मोनो १९ ऑगस्टच्या संकटातून बाहेर न पडतेय तोच अतिभारामुळे पुन्हा रखडली. आचार्य अत्रेनगर स्थानकाजवळ २१ ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास १५ मिनिटे मोनोरेल रखडली होती. ५० प्रवाशांना खाली उतरवून मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात आली. मोनोरेल सुरू झाल्यापासून अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करतच आहे. मोनोची ही रडतरखडत चालणारी गाडी भविष्यात तरी सुस्साट होणारी की मागल्या पानावरून पुढे सुरू राहणार?

विनोद साळवी

error: Content is protected !!