खडवलीतील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची विधान परिषदेच्या उपसभापतींकडून गंभीर दखल
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील पीडित २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रकरणी भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ६૪ (१), ६५(૨), ७૪, ११૮(२), ३(५), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधि.२०१२ चे कलम ४,६,८, सह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधि. २०१५ चे कलम ४२,७५,८२(१) प्रमाणे पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वेळी डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी शासनाची भूमिका अत्यंत गंभीर असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकील नेमले जातील.”डॉ .गोऱ्हे यांनी या प्रकरणातील पीडित मुलींच्या पुढील शिक्षणाची आणि पुनर्वसनाची जबाबदारीही लक्षात घेतली असून, “मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली व मुलांना कुठे राहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल,” असे त्या म्हणाल्या.
