वसई किल्ल्यात मराठी विरुद्ध हिंदी वरुण वाद!शिवाजी महाराजांच्या वेशात फोटो काढण्यास रखवालदारांचा विरोध
वसई/मराठी विरुद्ध हिंदी हा भाषिक वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. देशभरातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात. मात्र, महाराष्ट्राची मातृभाषा असलेली मराठी शिकण्यास विरोध करतात, असा आरोप मराठी लोकांकडून केला जातो. तर दुसरीकडे, काही हिंदी भाषिक परप्रांतीय म्हणतात की, “महाराष्ट्र भारतातच आहे, आणि हिंदी ही भारताची भाषा आहे, त्यामुळे आम्ही हिंदीतच बोलणार.”असा हट्ट करतात
या वादात आणखी एक ठिणगी पेटवणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ वसई किल्ल्यावरील आहे. एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख परिधान करून फोटोशूट करत होता. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकानं त्याला अडवलं, आणि हा मुद्दा थेट भाषिक वादाच्या दिशेने गेला. हा व्हिडिओ तुम्हीही पूर्ण पाहा आणि सांगा या प्रकरणात खरी चूक कोणाची आहे?
व्हिडिओ एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मराठी तरुण आणि हिंदी भाषिक सुरक्षा रक्षक यांच्यात झालेला वाद तुम्ही पाहू शकता. तो तरुण शिवाजी महाराजांच्या वेशात वसई किल्ल्यावर फोटोशूट करत होता. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवलं आणि फोटोशूट करण्यास मनाई केली.
जेव्हा त्याला नकार देण्याचं कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “शिवाजी महाराजांच्या वेशात तुम्ही इथे फोटो काढू शकत नाही.” हे संपूर्ण संभाषण तो हिंदी भाषेत करत होता. परंतु, जेव्हा त्याला मराठीत बोलण्यास सांगितलं, तेव्हा त्याने मराठीत संवाद साधण्यास नकार दिला, किंबहुना त्याला मराठी भाषा बोलता येत नव्हती त्यावरून मग दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वसई किल्ल्यावर अनेक तरुण दारू पिण्यासाठी बसतात, काही कपल्स अश्लील कृत्ये करतात, तसेच अनेक प्री-वेडिंग फोटोशूट्स देखील येथे घेतले जातात. या सर्व गोष्टींना कोणी थांबवत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या तरुणाला मात्र अडवण्यात आलं, ही बाब मराठी नेटकऱ्यांना फारच खटकली आहे

.