गृहमंत्री अमित शहांवर दगड भिरकावल्याचा कंगनाचा आरोप
नवी दिल्ली/लोकसभेत बुधवारी, २०ऑगस्ट २०२५रोजी मोठा गदारोळ झाला. काल १३० व्या घटनादुरुस्तीवरून विरोधक आक्रमक दिसले. पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात घरी पाठवण्याच्या या बिलावरून मोठे रणकंदन सुरू आहे. विरोधकांनी या बिलाची प्रत फाडत ती गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने भिरकावली. त्यावर मंडी येथील खासदार कंगना राणौतने मोठे वक्तव्य केले आहे.
कंगना राणौतने विरोधकांवर हल्लाबोल केला. संसदेत जे काही झाले, ज्या प्रकारचे दृश्य आम्ही पाहिले. ते कोणत्याही सभ्य समाजासाठी लाजिरवाणे आहे. जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभेत बिल सादर करत होते. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडून त्या अमित शाह यांच्या दिशेने भिरकावल्या. याशिवाय काही खासदारांनी तर कहर केला. ते दगड घेऊन आले होते. त्यांनी गृहमंत्र्यांना दगड मारल्याचा खळबळजनक दावा कंगना राणौत हिने केला. जेव्हा विरोधी पक्ष संसदेत हिंसा करत होते. तेव्हा आमच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी मोठ्या संयमाचे दर्शन घडवले. पण संसदेत असे प्रकार किती दिवस सुरू राहतील, हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे कंगना म्हणाली.
