मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान! १० ठार
*मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
*हिंदमाता, किंग सर्कल,अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी,अंधेरी सबवे बंद
*मराठवाड्यात ६ जणाचा मृत्यू इतर ठिकाणी चौघांचा बळी
*कोकण,मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर कित्येक गावांचा संपर्क तुटला
*धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा विसर्ग सुरू पाणलोट क्षेत्रातील गावांना धोक्याचा इशारा
*पुढील २ दिवस धोक्याचे?
मुंबई/ शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गेले दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला.या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचून रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.मुंबईच्या हिंदमाता,किंगसरकल,अंधेरीसह अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली.पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या २ ते 3 किमीच्या रांगा लागल्या होत्या.पावसाचा जोर वाढल्याने मुंबईतील शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली. तर ऑफिसेस लवकर बंद करण्यात आली . मराठवाडा ढगफुटीमुळे ६ जणांचा तर इतर ठिकाणी चौघांचा असा १० जणांचा बळी गेला. मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील २ दिवस धोक्याचे असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
दरम्यान मुंबईत हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्याशिवाय अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील दुसऱ्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळांबरोबर महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रातील मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.तर लोकल वाहतूकही उशिराने सुरु आहे. तर मुंबईसह ठाणे आणि कोकणात पुढील ४८तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.मराठवाड्यात धुवाधार पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये नांदेड 3, बीड २, हिंगोलीत 1 जणाचा मृत्यू झाला. तर मराठवाड्यातील ५७ महसूलमंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झाला. मुखेड तालुक्यात पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. नांदेडमध्ये ४ ते ४ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढलंय.
बुलढाण्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. आज आणि उद्या तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली आणि मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे.
या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यात बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले काठाच्या बाहेरून वाहत आहे. मन प्रकल्पाचे सर्व पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून मन नदीकाठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. याच पैनगंगेने रौद्ररूप धारण केल्याचे बघायला मिळाली.
